रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा एकोणतिसावा बळी; सिंधुदुर्गात तीन नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे आज (ता. १०) आणखी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पावसजवळील कुर्धे या गावातील होता. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्यांची जिल्ह्यातील संख्या २९ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या रुग्णांची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती
आज सापडलेल्या १२ रुग्णांमध्ये रत्नागिरीतील तीन, कामथे येथील सहा, कळंबणी येथील दोन आणि गुहागरातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८५१ झाली आहे. आठ जणांना आज बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये दापोलीतील ४, रत्नागिरीतील एक आणि समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथील तिघांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या आता ५४२ झाली आहे.

एका ४२ वर्षीय रुग्णाचा आज (१० जुलै) उपचारांदरम्यान मृत्यू झाला. करोनासोबत श्वसनप्रक्रिया बंद होऊन मरण पावलेला हा रुग्ण कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील रहिवासी होता. तो गेल्या २६ जून रोजी डोंबिवलीतून आला होता. त्याला चार जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर होता. त्याचा आज मृत्यू झाला. त्याचा मुलगा रत्नागिरीच्या समाजकल्याण भवनात करोनावर उपचार घेत आहे. त्याच्यासह जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६८ आहे. त्यापैकी नऊ जण गृह विलगीकरणामध्ये असून, तिघे इतर जिल्ह्यात उपचारासाठी गेले आहेत.

जिल्ह्यात सध्या ७५ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात २२, दापोली ८, खेड १४, लांजा ५, चिपळूण २०, मंडणगड तालुक्यात एक आणि राजापूर तालुक्यात ५ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी तीन व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५३ झाली आहे. त्यापैकी २०३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply