रत्नागिरी : करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एक जुलैपासून कडक लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यात पुढेही वाढ करण्यात आली; मात्र या लॉकडाउनमध्ये जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही प्रवेश देण्यास बंदी घालण्याच्या स्वतःच्याच धोरणाचा प्रशासनाला विसर पडला आहे. या आठ दिवसांत जिल्ह्याबाहेरून तब्बल आठ हजार ९०२ नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनानेच दिलेल्या अधिकृत आकडेवारीवरून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात एक जुलै रोजी सायंकाळपर्यंत एकूण एक लाख ६४ हजार १८९ चाकरमानी दाखल झाले. जिल्ह्यातून बाहेरगावी गेलेल्यांची त्या दिवशीपर्यंतची संख्या ८८ हजार ६७४ होती. प्रशासनाकडूनच देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, नऊ जुलैपर्यंत एक लाख ७३ हजार ९१ व्यक्ती दाखल झाल्या, तर रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांची संख्या ९२ हजार २१२ एवढी आहे.
याचाच अर्थ असा, की लॉकडाउनच्या आठ दिवसांच्या काळात जिल्ह्याबाहेरील आठ हजार ९०२ नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला. ही अधिकृत नोंद झालेली आकडेवारी आहे, याचाच अर्थ असा, की प्रशासनाची परवानगी घेऊनच हे नागरिक जिल्ह्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील आतापर्यंत करोना झालेल्या नागरिकांना मुंबई किंवा अन्य ठिकाणच्या प्रवासाचा इतिहास आहे, हे प्रशासनाकडूनच वेळोवेळी जाहीर करण्यात आले आहे. तसेच, मृत्यू झालेल्या २९ नागरिकांपैकीही बहुतांश नागरिकांना मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. असे असतानाही करोनाप्रतिबंधासाठी लागू केलेल्या कडक लॉकडाउनमध्ये प्रशासनानेच जिल्ह्याबाहेरील ८९०२ नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश दिला, याचा अर्थ काय घ्यायचा, असा सवाल उपस्थित होत आहे.
शिवाय, या लॉकडाउनमध्ये मुंबईतून किंवा बाहेरून रत्नागिरी जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे लॉकडाउन जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती.
या आठ दिवसांत करोना किती वाढला?
तीस जून रोजीच्या स्थितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५९९ होती. आज १० जुलैला ती संख्या ८५१वर पोहोचली आहे. तसेच, या कालावधीत तीन मृत्यूही झाले आहेत. एक धोरण जाहीर करायचे आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र भलतीच करायची, हा राज्य सरकारचा सिलसिला रत्नागिरी जिल्ह्यातही पाहायला मिळत आहे.
अत्यावश्यक कारणे असल्यामुळेच नागरिकांना प्रवेश दिला, असे स्पष्टीकरण दिले जाऊ शकते किंवा त्यांना पास अगोदरच देण्यात आला होता, असेही कारण सांगण्यात येऊ शकते; मात्र प्रसाराचे मूळ कारण माहिती असूनही, एवढ्या मोठ्या संख्येने बाहेरील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश दिल्यावर लॉकडाउनला काही अर्थच उरत नाही.
साधारण एक मे रोजीपासून मुंबईतून नागरिकांना कोकणात येण्यास परवानगी दिल्यानंतरच कोकणातील करोनाबाधितांची संख्या वाढली आहे, हे आतापर्यंतच्या स्थितीवरून स्पष्ट झाले आहे. तरीही स्थानिक नागरिकांना, त्यांच्या रोजच्या व्यवहारांना, उद्योगधंद्यांना लॉकडाउनची सक्ती करून, बाहेरील नागरिकांना प्रवेश देण्याच्या सरकारच्या आणि प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेबद्दल संताप व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्गातही साडेसहा हजारांहून अधिक व्यक्ती दाखल
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून ३० जूनपर्यंत एकूण एक लाख १८ हजार ३६६ व्यक्ती दाखल झाल्या. १० जुलैपर्यंत सिंधुदुर्गात आलेल्यांची संख्या एक लाख २५ हजार २१५ एवढी आहे. म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कडक लॉकडाउनच्या काळात सहा हजार ८४९ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. ३० जूनपर्यंत सिंधुदुर्गात एकूण करोनाबाधितांची संख्या २१४ होती. १० जुलैला ती २५३वर पोहोचली आहे.
……
One comment