रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या एक जुलैपासून रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (२८ जून) रोजी सायंकाळी चार वाजता घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५५६ असून, त्यापैकी ४२४ जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून, १०९ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन ती अधिक गंभीर होऊ नये, यासाठी पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ दिवसांच्या कडक अंमलबजावणीनंतर पुढील धोरण ठरवण्यात येणार आहे. मंगळवारी (३० जून) मध्यरात्रीपासून म्हणजेच एक जुलैपासून ही अंमलबजावणी केली जाणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच या लॉकडाउनदरम्यान सुरू राहणार असून, बाकी सर्वांच्या फिरण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवांची दुकानेच सुरू राहणार असून, बाकी दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच व्यवहार सुरू राहतील. सायंकाळी पाचनंतर नाइट कर्फ्यूची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
याबाबतची सविस्तर नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे. जिल्हाबंदीही केली जाणार आहे. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याला आळा घातला जाऊ शकेल.
रत्नागिरीतील करोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न सुरू करण्यात आले असून, खासगी डॉक्टरांचा सहभाग असलेल्या विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे. ते म्हणाले की, पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, खासदार विनायक राऊत या साऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर संजय मुखर्जी, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील तपासणीचे प्रमाण वाढल्यानंतर रुग्णांची संख्याही वाढली आहे. ती शून्यावर आणण्याचा प्रयत्न म्हणून आणि आरोग्यापेक्षा अधिक काही नाही, या भावनेतून लॉकडाउन कडक करण्यात येणार आहे. मुंबईच्या बहुतेक भागात आतापर्यंत कडक लॉकडाउन होते. कोकणातील परिस्थिती अशीच राहिली, तर ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याकरिता बाकीच्या काही जिल्ह्यांनी जसा निर्ण. घेतला, तसा कडक लॉकडाउनचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातही घेण्यात आला आहे.
ऑपरेशन ब्रेक द चेन
म्हणून पुन्हा लॉकडाउन करण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले की, एक ते आठ जुलैपर्यंत काटेकोर लॉकडाउन केले जाईल. अत्यावश्यक सेवा, त्या सेवेतील कर्मचारी, त्यांची वाहने वगळता सर्वांनाच घराबाहेर पडायला बंदी घालण्यात येणार आहे. जिल्हाप्रवेश बंदीही लागू राहील. दुचाकी, बस, टॅक्सी, कार, दुकाने बंद राहतील. शासकीय कार्यालयात १० टक्के उपस्थिती राहील. स्वच्छता कर्मचारी, बँका, पोस्ट, फोन, इंटरनेट, अन्नधान्य, दूध, भाजीपाला, पेट्रोल पंप, प्रसारमाध्यमे, पशुवैद्यकीय दवाखाने, शेतीविषयक कामे, कृषीमाल, शीतगृहे, पशुखाद्य दुकाने, बंदरे, वैद्यकीय दुकाने, दवाखाने, रुग्णवाहिका, चष्मा दुकाने तसेस आरोग्याशी संबंधित व्यवहार सुरू राहतील. सतत प्रक्रिया करणारे उद्योग सुरू राहतील. मांस, मासेविक्रीची दुकाने बुधवार, शुक्रवार आणि रविवारी सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तू घरपोच देण्याबाबत चर्चा सुरू आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच दुकाने सुरू राहतील. त्यानंतर सर्व व्यवहार बंद राहतील. प्रतिबंधित क्षेत्रातील नियम आणखी कडक राहतील.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना श्री. सामंत म्हणाले, जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी कोल्हापूर येथे जाऊन त्याविषयीची माहिती घेतली आहे. मृत्युदर कमी करण्याबाबत रत्नागिरीतील खासगी डॉक्टरांशी चर्चा केली आहे. त्यांच्या सहभागातून विशेष कृती दल स्थापन करण्यात आले आहे. आजारावर उपचार म्हणून कोणती नवी औषधे, नवी उपाययोजना करता येईल, याबाबत हे दल काम करणार आहे. रत्नागिरीतील डॉ. लोटलीकर, डॉ. परकार, डॉ. औरंगाबादकर तसेच इतर फिजिशियन्स आणि स्त्रीरोगतज्ज्ञांचा त्यामध्ये समावेश आहे. खासगी डॉक्टरांनाही काही अडचणी आहेत. त्या समजून घेतल्या जातील. चिपळूण, खेड इत्यादी ठिकाणच्या डॉक्टरांनाही या दलात समाविष्ट करण्याची सूचना श्री. सामंत यांनी केली. डॉक्टरांनी नकारात्मक भूमिका घेऊ नये. सर्वांनी सहकार्य करावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रत्येकावर आलेले संकट आहे, असे समजून काम करायला हवे. शंकांचे निरसन करण्यासाठी तसेच गरजेच्या वेळी मदत म्हणून जिल्ह्यात कॉल सेंटर सुरू करायचा प्रयत्न आहे.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात एक मृतदेह दोन दिवस शवागारात पडून होता. त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयातील डॉ. चव्हाण यांनी आधी पॉझिटिव्ह, तर नंतर निगेटिव्ह सांगितला. त्यामुळे मृतदेह दोन दिवस शवागारात पडून राहिला. त्यावर अंत्यसंस्कार करण्याबाबत नातेवाइकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना समजली नव्हती. याबाबत पत्रकाराच्या प्रश्नाची दखल घेऊन श्री. सामंत म्हणाले की, ही बाब अत्यंत गंभीर आहे. एवढा मोठा प्रकार घडूनही त्याची माहिती जिल्हा प्रशासन, पोलीस, पालकमंत्री, मंत्र्याला कळविली जात नसेल, तर या अंदाधुंदीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित समिती नेमावी आणि दोन दिवसांत त्याचा अहवाल घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. त्याची कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
…….

One comment