गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रशासनातर्फे स्वागतच; सात ऑगस्टपर्यंतच प्रवेशाचे टिपण रद्द : उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी १० जुलै रोजी घेतलेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिली.

परजिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी यायचे असेल, तर सात ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत पोहोचावे, असे टिपण जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्याचे समजल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. त्या विषयावर शांतता समितीची बैठक झाली. त्यामध्ये चर्चा होऊन जिल्हाबंदीचे टिपण रद्द केल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

देशातील वेगवेगळ्या भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात (क्वारंटाइन) चौदा दिवस ठेवण्यापेक्षा सात दिवस ठेवणे, त्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोलमाफीची सुविधा देणे, त्यांच्या पासेसची व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन, तसेच त्यांची करोनाविषयक तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली.

कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यांना कोकणात येण्यास विरोध नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही श्री. सामंत यांनी या वेळी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply