रत्नागिरी बाजारपेठ सुरू करण्यासाठी नियमावली जारी; चिपळुणातही ११ जुलैपासून बाजार उघडणार

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे बंद असलेली रत्नागिरी शहरातील बाजारपेठ काही अटींवर सुरू करण्यास रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी यांनी परवानगी दिली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बाजारपेठेतील दुकाने सम आणि विषम तारखांनुसार सुरू ठेवता येणार आहेत. चिपळूण बाजारपेठ ११ जुलैपासून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू करण्यास प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी परवानगी दिली आहे.

करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने लागू केलेली संचारबंदी येत्या ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे; मात्र दुकाने दीर्घकाळ बंद राहिल्याने होणाऱ्या नुकसानीबाबत रत्नागिरी शहरातील व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नऊ जुलै रोजी विचारविनिमय करण्यात आला. त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार सर्व पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील दुकाने रोटेशन पद्धतीने सुरू करण्यास संमती दिली आहे.

रत्नागिरी शहरातील करोनाप्रतिबंधित क्षेत्राची मुदत संपल्याने यानंतर शहरातील सर्व प्रकारची दुकाने एकाच वेळी सुरू ठेवल्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन सामासिक अंतर राखणे जोखमीचे ठरू शकेल. त्याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागातील दुकाने सुरू ठेवण्याचाबाबतचे अधिकार उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी यांना प्रदान केले आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार रत्नागिरी शहरातील दुकाने ठरावीक नियमांचे पालन करून सुरू ठेवता येतील.

सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि मंगळवार, गुरुवार, शनिवार कोणती दुकाने सुरू ठेवता येतील, याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी शहराचे विविध १८ भाग पाडण्यात आले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक दुकानांमध्ये सामाजिक अंतर राखणे, मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर इत्यादी नियमांचे पालन करावे लागणार आहे.

चिपळूण बाजारपेठही ११ जुलैपासून सुरू करायला परवानगी
चिपळूणमधील व्यापारी संघटना, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्या रेट्यामुळे चिपळूण बाजारपेठ ११ जुलैपासून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू करण्यास प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी परवानगी दिली आहे. नवयुग व्यापारी मंडळाचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी ही माहिती दिली.

बाजारपेठ सुरू करायला काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

१० जुलैला व्यापारी आणि प्रशासनाची बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते आदी उपस्थित होते. प्रांताधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना ११ जुलैपासून बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी व्यापारी प्रतिनिधी शिरीष काटकर, सुचयअण्णा रेडीज, अरुणशेठ भोजने यांच्याकडून सर्व व्यापाऱ्यांकडून नियम व अटींचे पालन होईल, असे प्रतिज्ञापत्र करून घेण्यात आले आहे.

या अटींनुसार बाजारपेठ सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहील. सोमवारी संपूर्ण बाजारपेठ शंभर टक्के बंद राहील. ११ जुलैपासून वाइन शॉपही सुरू होतील. हॉटेलमधून केवळ पार्सल व होम डिलिव्हरीला परवानगी राहील. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकण्यास मनाई आहे. चिकन, मटन, मच्छीची विक्री बुधवार, शुक्रवार व रविवारी सुरू राहील. व्यापाऱ्यांनी मास्क, टेम्परेचर मीटर, सॅनिटायझर या गोष्टी वापरणे आवश्यक आहे. ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, त्यासाठी व्यापाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. रिक्षा व्यवसायाला मात्र अद्याप परवानगी नाही. केशकर्तनालयांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व नियम पाळून दुकाने सुरू ठेवता येणार आहेत.
……

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply