रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पँथर) अधिवासाला वातावरण अनुकूल असून, संगमेश्वर तालुक्यात कोंडिवरे येथे सापडलेल्या काळ्या बिबट्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती रत्नागिरीच्या परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड यांनी दिली.
संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथे १० जुलै रोजी ब्लॅक पँथरचे दर्शन घडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित झाला. त्याबाबत श्रीमती लगड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्याला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, या भागात ब्लॅक पँथरचा वावर असल्याची माहिती मिळाली आहे. व्हिडिओमध्ये दिसलेला प्राणी म्हणजे ब्लॅक पँथर म्हणजे काळा बिबट्याच आहे; मात्र वन विभागाला आतापर्यंत काळा बिबट्या सापडलेला नाही. आता दिसलेल्या बिबट्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी लवकरच तेथे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. अजून तरी ब्लॅक पँथर मोठ्या प्रमाणात सापडलेले नसल्याने त्यांची मोजणी झालेली नाही. यापूर्वी २०१५ साली राजापूरमध्ये विहिरीत पडलेला ब्लॅक पँथर सापडला होता. त्याला वाचविण्यात यश आले होते. त्यानंतर तसा बिबट्या सापडलेला नाही. मात्र तो गावात येत नाही. तो हल्ला करणारा प्राणीही नाही. त्यामुळे ग्रामस्थांना त्याच्यापासून काळजी नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोकणात नेहमी सापडणाऱ्या बिबट्याच्या जातीचाच तो फक्त वेगळ्या रंगाचा प्राणी आहे. त्याच्या अधिवासाला कोकणातील वातावरण चांगले आहे. त्यामुळे त्याचा अधिवास कोकणात असू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
लांजा महाविद्यालयातील वनशास्त्राचे अभ्यासक प्रा. दिग्विजय लवटे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती दिली. बिबट्या हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे. परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे. बिबट्या आणि चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांमध्ये खूपच फरक आहे. भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे, तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चित्त्याचे ठिपके मुखत्वे भरीव असतात, तर बिबट्याचे ठिपके पोकळ असतात. चित्त्याची शरीरयष्टी लांबसडक आणि अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते, तर बिबट्याची बहुधा मांजराप्रमाणेच भरीव असते. बिबटे मनुष्यवस्तीजवळ राहणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दर वर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात. चित्ता मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात. काळे बिबटे दाट जंगलांमध्ये जास्त असतात. तेथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते.
प्रा. लवटे म्हणाले, काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. मेलॅनीन हे त्वचेतील रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने देशाच्या दक्षिणेकडील दाट जंगलात आढळतात. किंग कोब्रा आणि काळा बिबट्या हे दक्षिणेकडील राज्यांमध्ये आढळणारे प्राणी आहेत. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्यात काळा बिबट्या सापडला होता. त्यापैकीच एखादा काळा बिबट्या संगमेश्वर तालुक्यात आला असावा.
(जंगल बुक या प्रसिद्ध कार्टून सीरिजमध्ये मोगलीसोबत असलेला बघिरा हा प्राणी ब्लॅक पँथर आहे.)
……..