रत्नागिरी जिल्ह्यातील करोनामुक्तीचे प्रमाण ६५ टक्के; मृतांची संख्या तीस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे ५६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ६५ टक्के झाले आहे. आज आणखी एका मृत्यूची नोंद झाल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ३० झाली आहे. सिंधुदुर्गातील एकूण २५३पैकी २०४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
१० जुलैच्या सायंकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८५१ झाली आहे. आणखी २७८ जणांचे नमुने रत्नागिरीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आज १५ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये घरडामधील ३, कामथे येथील एक, रत्नागिरीतील ११ आणि रत्नागिरीच्या समाजकल्याण भवनातील एकाचा समावेश आहे. आता विविध रुग्णालयांमथ्ये उपचारांखाली असलेल्यांची संख्या २८७ आहे. त्यापैकी नऊ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, तर चौघे जण इतर जिल्ह्यांत उपचारासाठी गेले आहेत.

दरम्यान, खेड तालुक्यातील कुंभाड येथील एका ७० वर्षीय महिलेचा गेल्या आठ जुलै रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. तिचा करोनाविषयक अहवाल आज मिळाला असून, तो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ३० झाली आहे.

सध्या जिल्ह्यात ७५ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, त्यांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी २२, दापोली ८, खेड १४, लांजा ५, चिपळूण २०, मंडणगड १, राजापूर ५.

संस्थात्मक विलगीकरणासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या संशयित ८२ जणांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय – ५३, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – १०, रुग्णालय, कळंबणी – ३, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल – ७, ग्रामीण रुग्णालय, गुहागर-३, केकेव्ही, दापोली – ५.

याशिवाय मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने १४ हजार ३२९ जण होम क्वारंटाइनखाली आहेत. त्यांच्यासह आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ७५ हजार ६१३ जण दाखल झाले आहेत. जिल्ह्यातून ९२ हजार ९३६ जण बाहेरच्या जिल्ह्यात किंवा राज्यात गेले आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंतच्या करोनाबाधितांची एकूण संख्या २५३ असून, त्यापैकी २०४ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. ४३ जणांवर सध्या उपचार सुरू असून, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण एक लाख २६ हजार ९७४ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
…..

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply