विकास काटदरे : तळमळीचा कार्यकर्ता, हळवा माणूस

डोंबिवलीचे पत्रकार विकास काटदरे यांच्या निधनाचं (ता. ७ जुलै) वृत्त समजलं आणि त्यांच्या सहवासातल्या अनेक आठवणी दाटून आल्या. पंचवीस वर्षांपूर्वी सुमारे पंधरा वर्षं मी त्यांच्या सहवासात होतो. मुंबईत नोकरी किंवा रोजगार मिळणं सोपं असतं, पण राहायला जागा मिळणं, घर विकत घेणं किंवा अगदी भाड्याची खोली मिळणंसुद्धा तसं कठीण असतं. मलाही १९७९ साली मुंबई सकाळमध्ये नोकरी मिळाली. पण राहण्याच्या जागेचा प्रश्न होता. विकास काटदरे यांच्यामुळेच तो तेव्हा सोडविला गेला. एका अर्थाने मुंबईत राहण्याची व्यवस्था त्यांच्यामुळेच झाली होती, हे मला कधीही विसरता येणार नाही.

नोकरी मिळाल्यानंतर सुरुवातीचा काही काळ मी डोंबिवलीत मावशीकडे राहिलो. त्यामुळे मी डोंबिवलीकर झालो. कारण डोंबिवलीतच राहायचं हे मी तेव्हा नक्की केलं. त्यामुळे त्यादृष्टीने मी प्रयत्न सुरू केले. पण माझा तेव्हाचा पगार आणि अवघी दोन-तीन वर्षं वयाची नोकरी एवढ्या आधारावर मला ब्लॉक विकत घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे भाड्याच्या जागेचा पर्यायच माझ्यासमोर होता. भाड्याची जागा घ्यायची झाली तरी त्यासाठी अनामत म्हणजे डिपॉझिट द्यायला हवं होतं. अर्थातच माजी तेवढीही ऐपत नव्हती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सारस्वत बँकेचे तेव्हाचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क आला. त्यांच्याशी बोलताना, पत नसलेल्यांना पत मिळवून देण्यासाठी सारस्वत बँक काम करते असा विश्वास त्यांनी दिला. अशा तऱ्हेनं बँकेने कर्ज पुरवण्याची तयारी दर्शवली. पण त्यासाठी दोन जामीन आवश्यक होते. त्यापैकी एक जामीन म्हणून विकास काटदरे उभे राहिले. जामीन आवश्यक आहे, एवढं म्हणताच त्यांनी कर्जासाठी आवश्यक असलेली आपली कागदपत्रं तातडीने मला दिली. ही कागदपत्रं देईपर्यंत माझी त्यांच्याशी तशी फार मोठी ओळख नव्हती. फार परिचय नव्हता. डोंबिवलीत पूर्वेला राजाजी पथावर स्वा. सावरकर वाचनालय शिवसेनेचे कार्यकर्ते अजित नाडकर्णी, विजय प्रधान अशा काही मंडळींनी सुरू केलं होतं. तेव्हा मीही त्यांच्यासोबत होतो. याच दरम्यान विकास काटदरेंची ओळख झाली. त्या निमित्तानं गाठीभेटी होत होत्या. तेवढ्याच ओळखीवर बँकेत जामीन म्हणून ते माझ्यासाठी उभे राहिले.

बँकेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रं पूर्ण करत असताना मला त्यांच्याविषयीची माहिती मिळाली आणि मला धक्काच बसला. कर्जाचा अर्ज भरताना कर्जदार किंवा जामीन यांचं पूर्ण नाव आवश्यक असतं. पण काटदरे यांनी फक्त विकास काटदरे एवढंच नाव मला दिलं होतं. अर्ज बँकेत सादर केल्यानंतर बँकेने त्यांचं पूर्ण नाव द्यायला सांगितलं, तेव्हा मी तसं काटदरे यांना सांगितलं. पूर्ण नाव खरोखरच द्यायला हवं आहे का, असं त्यांनी विचारलं. तशी गरज आहे, असं म्हटल्यावर त्यांनी (आता मला आठवतंय त्याप्रमाणे) विकास महादेव काटदरे असं आपलं नाव असल्याचं सांगितलं. नाइलाजानेच पूर्ण देतोय, असंही ते म्हणाले. त्याचं कारण मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा कळलं की, ते पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमात लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांच्या आईवडिलांचं नावच त्यांना माहीत नाही. बालकाश्रमाने त्यांना नाव दिलं होतं. त्यात वडिलांच्या नावाचा संबंधच नव्हता. अनाथाश्रमात वाढलेला एक माणूस माझ्यासारख्या कुटुंबवत्सल माणसाला उभं राहण्यासाठी मोठा आधार ठरला होता. मला तेव्हा त्याचं मोठं अप्रूप आणि वेगळेपणही वाटलं. त्यांच्याकडे बघायचा माझा दृष्टिकोनच त्यामुळे बदलला. मुंबईत स्थिरावायला मला त्यांची मोठी मदत झाली. त्यातूनच त्यांची असलेली मैत्री घट्ट होत गेली. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची सतत भेट होत गेली. त्यांच्यातला तळमळीचा कार्यकर्ता आणि हळवा माणूसही मला समजत गेला.

डोंबिवलीत सावरकर वाचनालयातर्फे संकल्प नावाचं एक त्रैमासिक सुरू करण्यात आलं. वाचनालयाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मासिकाचा विशेषांक काढायचं ठरवण्यात आलं. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत मी घ्यायची, असंही ठरलं. मुलाखत घ्यायला बाळासाहेब ठाकरे यांच्याशी थेट संपर्क असलेले अजित नाडकर्णी आणि विकास काटदरे या दोघांचाही मला तेव्हा चांगला उपयोग झाला. वांद्र्यातल्या कलानगरमधल्या मातोश्री या आज खूपच चर्चेत असलेल्या बाळासाहेबांच्या निवासस्थानी मी कोणतीही अडचण न येता तेव्हा अगदी सहजपणे जाऊ शकलो आणि त्यांची मुलाखत घेऊ शकलो.

परळच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये काटदरे सर शारीरिक शिक्षणाचे शिक्षक होते. या काळात त्यांनी गड, किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणांना विद्यार्थ्यांची सफर घडवून आणली. अशाच काही मोहिमांमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. लोणावळ्याजवळचा लोहगड आणि विसापूर हे दोन किल्ले, शिवरायांची राजधानी असलेला रायगड मी त्यांच्याबरोबर पाहिला. ठाण्यातले त्यांचे मित्र बेडेकर सर, डिमेलो सर हेही तेव्हा त्यांच्याबरोबर असायचे.

त्या काळात शिवसेनेचा विचार असलेली स्थानीय लोकाधिकार समिती वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये दबदबा राखून होती. न्यू इंडिया अॅन्शुरन्स कंपनी, एलआयसी, पोर्ट ट्रस्ट तसंच इतर काही कार्यालयांमध्येही स्थानिकांना नोकऱ्या आणि सोयी-सवलती मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह धरून ही समिती काम करत होती. नंतरच्या काळात मंत्री झालेले सुधीरभाऊ जोशी या समितीचे काम तेव्हा पाहत असत. या समितीमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. ते कार्यक्रम अनुभवण्याचं आणि त्याच्या बातम्या देण्याचं काम मी विकास काटदरे यांच्या आग्रहावरूनच करत असे. त्यातून माझ्या अनेकांच्या ओळखी होऊ शकल्या.

१९८१ साली मुंबई सकाळमध्ये मुंबई संध्या नावाचं सांजदैनिक सुरू झालं होतं. श्रीकांत आंब्रे आणि भाऊ तोरसेकर त्यावेळी मुंबई संध्याची जबाबदारी सांभाळत असत. तेव्हा मुंबई संध्याचा डोंबिवलीचा प्रतिनिधी म्हणून मी काम करत होतो. तेव्हा महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी श्रीकांत ऊर्फ कांत टोळ आणि मुंबई सकाळचे प्रतिनिधी सुरेंद्र वाजपेयी यांचा डोंबिवलीच्या पत्रकारितेवर ठसा होता. वर्चस्व होतं. डोंबिवलीत पत्रकारिता करताना त्या दोघांशीही संपर्क साधणं अपरिहार्यच असायचं. कारण त्यांना डोंबिवलीची नसन् नस माहीत होती. पण ते वयाने आणि पत्रकारितेतही अनुभवी होते. त्यांच्याशी थेट संपर्क साधणं माझ्यासारख्या नवोदिताला तसं कठीणच होतं. तेव्हा विकास काटदरे यांचा मला खूपच उपयोग झाला. तेव्हा ते प्रत्यक्ष पत्रकारितेमध्ये नव्हते. पण मला त्यांचा खूप उपयोग होत असे. कालांतराने त्यांनी साप्ताहिक मार्मिक आणि त्यानंतर सामना दैनिकाचं काम सुरू केलं, ते अखेरपर्यंत.

दरवर्षी २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापनदिन हे दोन्ही कार्यक्रम माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात व्हायचे. ते मोठे जंगी कार्यक्रम असायचे. या कार्यक्रमांच्या बातम्या देण्यासाठी मुंबई सकाळचे तेव्हाचे वृत्तसंपादक आणि नंतरचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर मला पाठवत असत. पण त्या भव्य दिव्य कार्यक्रमांच्या गर्दीतही विकास काटदरे यांच्यामुळे मला विशेष स्थान मिळत असे. या प्रत्येक कार्यक्रमादरम्यान किंवा इतरही वेळी काटदरे सरांशी सतत संपर्क होत असे. वेगवेगळ्या विषयावर बोलणं होत असे. त्याच काळात जागतिक अपंग दिन साजरा झाला, तेव्हा अनेक अंध आणि अपंग तसंच समाजातल्या उपेक्षित घटकातल्या अनेक व्यक्तींशी काटदरे यांनी माझी भेट घडवून आणली. त्यांच्यावर लेख लिहिण्याची संधी मला मिळाली. या व्यक्तींशी त्यांनी माझी भेट घडवून आणली, ती त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत यासाठी. काटदरे यांची त्यासाठी तळमळ असायची. काहीशा हट्टी आणि आग्रही स्वभावाचे सर अशा व्यक्तींबाबत कातर, हळवे होत, हे मी अनुभवलंय. व्यक्तिगत जीवनात मध्यंतरीच्या काळात ते काहीसे अस्वस्थ होते. मुलाचा विवाहविच्छेदही त्यांच्या मनात आत कुठेतरी खोलवर त्यांना सलत होता. हे खरंच दुर्दैवी आहे.

डोंबिवलीनंतर तीन वर्षं आम्ही ठाण्यात राहायला गेलो होतो. त्यानंतर रत्नागिरीत आलो, त्यालाही पंचवीस वर्षं झाली. या काळात काटदरे सरांच्या गाठीभेटी कमी कमी होत गेल्या. अलीकडे तर त्यांचा संपर्कही नव्हता. त्यांच्या निधनानंतर सुरुवातीच्या काळातल्या काही आठवणी जाग्या झाल्या. कायम खळाळत हसणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यामागे प्रचंड दुःख होतं. ते त्यांनी कधी कुणाला जाणवू दिलंच नाही. आता तो खळाळ आणि त्यांच्या आठवणी जपणं तेवढं हातात राहिलं आहे. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

 • प्रमोद कोनकर, रत्नागिरी

5 comments

 1. श्री.कोनकर,
  सप्रेम नमस्कार.
  पत्रकार काटदरे सरांच्या विषयी आपण लिहले ला लेख खुपच वास्ताववादि आहे.तुमचे आणि सरांचे ऋणानुबंध खरच खूप जवळचे होते हे यातुन स्पष्ट दिसून येते. आपल्या लेखणीला माझा सलाम. आपण माझ्या पत्रकारितेतील गुरु आहात. धन्यवाद!
  गोविंद राठोड,खेड

 2. खूप वाइट वाटले काटदरे सरांच्या जाण्याने, सर आम्हाला आर.एम.भट शाळेत एन.सी.सी. ला होते. पुन्हा शाळेचे दिवस आठवू लागलेत.

 3. भावूक करणारा चांगला लेख

 4. दादा, तू काटदरे सरांच्या वर लिहिलेला लेख वाचून तुझ्या नोकरी-व्यवसायाची सुरुवात कळली. तू माझी ओळख करून दिली होतीस त्यांच्याशी फक्त एकदाच.मी त्यांना पहिलं होत, पण काटदरे सरांच नाव नेहमी तुझ्या तोंडी असे तेव्हा. आज लेख वाचून जुन्या आठवणी जागरूक झाल्या आणि त्यांच्या आयुष्याची फरफट वाचून वाईटही वाटल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐

Leave a Reply