रत्नागिरी जिल्ह्याचा विकास महाराष्ट्राला साजेसा – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा विकास महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीला साजेसा होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

महाराष्ट्र राज्याच्या ६७व्या स्‍थापना दिनानिमित्ताने जिल्हा पोलीस संचलन मैदानावर आयोजित केलेल्या जिल्ह्याच्या मुख्य समारंभात ते बोलत होते. पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

ते म्हणाले, रत्नागिरी विमानतळ उड्डाणासाठी तयार आहे. रेल्वे स्टेशनदेखील नव्याने कात टाकत आहे.. प्रशासनाची इमारत १०० कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वास येत आहे. नगरपालिकेची आणि जिल्हा परिषदेची इमारतदेखील पूर्ण झाली आहे. १६९ कोटी रुपयांमधून पोलीस इमारतीचे बांधकाम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र लवकरच सुरू होणार आहे. आरेवारे किनाऱ्याजवळील वन खात्याच्या जमिनीवर ५ कोटी रुपयांचा इको टुरिझम प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल. महाराष्ट्राला साजेशा असा या विकासाला जिल्ह्यातील जनतेने साथ द्यावी.

रत्नागिरी जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी नासा आणि इस्रोयेथील अभ्यास दौरा योजना गेल्या ४ वर्षांपासून रत्नागिरीत सुरू आहे. ती योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याचा अर्थ रत्नागिरीचे जिल्हा प्रशासन नाविन्यपूर्ण योजना राबवितो. हे महाराष्ट्राच्या पातळीवर सिध्द झाले आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा आराखडा २९ कोटींनी वाढवून दिला आहे. यामधून कृषी, मत्स्य, शिक्षण, पर्यटन अशा सगळ्याच बाबींवर आपण खर्च करत आहोत. गेल्या अर्थिक वर्षात नियोजन समितीच्या माध्यमातून ४०६ कोटींचा निधी खर्च झाला आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी केंद्रीय विद्यालय मंजूर झाले आहे. त्याला 1 रुपया नाममात्र दराने नाचणे येथील अडीच हेक्टर जागा देण्याचा निर्णय कालच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक वैभवामध्ये फार मोठी भर पडणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना १०० टक्के पूर्ण केली. नमो किसान योजनेचा जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार ५८९ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. फळपीक विम्यामधून १०७ कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून ३१ रुग्णांलयाची नोंद झाली आहे. यामधून शेकडो रुग्णांना फायदा दिला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातूनदेखील ४ कोटी ७८ रुपयांचे अनुदाने लाभार्थ्यांना दिले आहे. महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा प्रशासकीय इमारती परिपूर्ण असलेला आणि नवा असलेला हा पहिला जिल्हा आहे, याचा मला अभिमान आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. रत्नागिरीमध्ये उभारलेल्या शिवसृष्टीला लाखो पर्यटकांनी आजपर्यंत भेट दिली आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी, इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सागर कवच अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक विवेक पाटील, अंमलदार सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गव्हाणे, शीतल पिंजरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्ररशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रमांतर्गत राजापूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल मुख्याध्यापक एस. बसवराज, वैष्णवी पाटोळे, देवयानी महात्मे, प्रशब्ध कांबळे, दुर्वा शिंदे, दिपाल भंडारी, मंजिरी तांबे, गंधार संसारे, सार्थक दुर्गावळे, आर्यन मेन, कार्तिक हदमबर यांचा सन्मान करण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते अश्विनी मोरे, निकिता जाधव, साक्षी गावणांग, धनश्री मोरे यांना वितरित करण्यात आला.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलास देण्यात येणाऱ्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply