मुंबई : जगभरात सर्वत्र करोनाने थैमान घातले असून, महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने अडीच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर, काही दिलासादायक गोष्टीही घडत आहेत. मुंबईत १४ जुलै रोजी एका आजोबांना करोनावर मात केल्यावर घरी सोडण्यात आले. ते १५ जुलै २०२० रोजी आपल्या वयाची १०१ वर्षे पूर्ण करणार आहेत. अर्जुन गोविंद नारिंग्रेकर असे या आजोबांचे नाव आहे, असे आकाशवाणीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
मुंबईमधील जोगेश्वरी येथील महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात या आजोबांवर उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी मिळून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. हे आजोबा शिक्षक होते. या आजोबांचा करोनाविरोधातील लढा यशस्वी झाल्याने बाकीच्या रुग्णांना प्रेरणा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. करोनाची लागण झाली, तरी घाबरून न जाता सूचनांचा अवलंब करून उपचार करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास करोनाशी प्रतिकार करण्यास अधिक बळ मिळते, हे अशा उदाहरणांवरून स्पष्ट होते.
(या आजोबांचा व्हिडिओ सोबत दिला आहे. तेथे दिसत नसेल, तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)