मुंबई : गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य शासनाने कोकण रेल्वेमार्गावर गाड्या सोडण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधावा, असे निवेदन मुंबईतील चाकरमान्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. कोकणातील चाकरमान्यांच्या वतीने जयेश नारायण वालावलकर यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
हे सविस्तर पत्र असे –
गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण आहे. हा सण कोकणात घरोघरी साजरा केला जातो. लाखो गणेशभक्त सणानिमित्त महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आपपल्या गावी कोकणात पोहोचतात. त्यात मुंबई, पुण्यातून गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. करोनाचा प्रभाव आणि सरकारने सुरू केलेली अनलॉक प्रक्रिया लक्षात घेता राज्य सरकारने लवकरात लवकर रेल्वेची वाहतूक सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत. लॉकडाउन काळात बंद झालेली १२० दिवसांची आरक्षण व्यवस्था ३१ मेपासून सुरू करण्यात आली होती. तरीही आंतरजिल्हा प्रवासबंदीचे कारण देत पुढील चार महिन्यांनंतरचेही आरक्षण राज्यातील प्रवाशांना उपलब्ध होत नसल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सामान्य माणसाने मुंबई-सावंतवाडी असा प्रवास चार प्रवासी क्षमता असलेल्या खासगी गाडीने करायचा विचार केला, तर २० हजार ते २५ हजार रुपये भाडे सांगितले जात आहे. त्या चार जणांमध्ये हे भाडे विभाजित केले, तरी प्रति व्यक्तीला साडेपाच हजार आणि परतीचा धरून ११ हजार रुपये खर्च होऊ शकतो. ते दर सर्वसामान्य, गरीब चाकरमान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे फक्त ऐपत असलेलेच प्रवास करू शकतील. त्यांनीच प्रवास करावा, असे राज्य सरकारला सुचवायचे आहे का, असा प्रश्न आज सर्वसामान्य चाकरमान्यांना पडला आहे. कारण जूनपासून ज्या स्पेशल ट्रेन रेल्वेमार्फत सोडल्या गेल्या, त्यापैकी नेत्रावती एक्स्प्रेस आणि मंगला एक्स्प्रेस या दोन गाड्या कोकणातून जातात. पण राज्य सरकारने रेल्वेला महाराष्ट्रातील स्थानकांचे तिकीट देऊ नये असे, सुचविले आहे. त्यामुळे रेल्वेने या स्थानकांचे आरक्षण देणे बंद केले आहे. गणेशोत्सवातही कोकणात रेल्वेगाड्या थांबल्या नाहीत, तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो, हे राज्य सरकारने ध्यानात घेऊन पुढील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
ज्या प्रकारे सरकारने बाहेरील राज्यातील विस्थापितांना त्यांच्या मूळ गावी सुखरूप पोहोचवले त्याचप्रकारे सर्व सुरक्षेच्या बाबींची पडताळणी करून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू करावी. या गाड्या मुंबई सीएसएमटी, ठाणे, घाटकोपर, भांडुप, वांद्रे, बोरिवली, दिवा तसेच पनवेल ह्या स्थानकातून सोडण्यात याव्यात. मुंबईतील छोटे कोकण म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांडुपमध्ये कोकणी माणसांची संख्या लक्षणीय आहे आणि एकंदर महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या सर्वसामान्यांसाठी १२ ऑगस्टपर्यंतच्या लोकल रेल्वे सेवा शिथिलीकरणामुळे गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यास होणारी गैरसोय लक्षात घेता सरकारने भांडुप रेल्वे स्थानकावरून गणपती विशेष भांडुप-सावंतवाडी रेल्वे चालवावी. त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध करून आगाऊ प्रवाशांची संख्या आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकूण किती रेल्वे चालवाव्या लागतील ह्याची संबंधितांना माहिती पुरवावी. अनेक वर्षांपासूनची भांडुपकरांची गणपती विशेष भांडुप ते सावंतवाडी ही रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी ही प्रलंबित मागणी “हीच ती वेळ सेवा सुरू करण्याची” असे समजून जनसामान्यांसाठी सुरू करण्यात यावी. कोकणातील लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी, असे आम्हाला वाटत आहे.
अपेक्षा आहे, की या बाबतीत सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल.
– जयेश वालावलकर
(संपर्क : ९०८२६२७४४८, ९९२०१०५०९१)
(हे ई-मेलस्वरूपी पत्र वालावलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र डणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तसेच कोकण रेल्वेलाही पाठविले आहे.)
……
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड