रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ जुलै) १८ रुग्णांना करोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ७२६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४० जण आतापर्यंत करोनातून मुक्त झाले आहेत.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीत काल (१८ जुलै) रात्री करोनाचे ४६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२१० झाली आहे. आज (१९ जुलै) जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून तीन, कोव्हिड केअर सेंटर केकेव्ही, दापोली येथून दोन, कोव्हिड केअर सेंटर घरडा येथून सहा आणि समाजकल्याण भवन रत्नागिरी येथील सात जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२६ झाली आहे. आतापर्यंत ४१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या ४४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३५९ रुग्ण रुग्णालयात दाखल असून, १७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. पाच रुग्ण इतर जिल्ह्यांत उपचारासाठी गेले असून, ६२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संस्थात्मक विलगीकरणाची विविध रुग्णालयांतील स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – ६९, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ३, कोव्हिड केअर सेंटर पेढांबे ७, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल – ४, ग्रामीण रुग्णालय गुहागर – १, केकेव्ही, दापोली – २५. असे एकूण ११२ संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर होम क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या १४ हजार ३०१ इतकी आहे.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात १८ जुलै २०२०पर्यंत एक लाख ९४ हजार ५८८ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत, तसेच इतर जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या ९८ हजार ६६२ आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल (१८ जुलै) प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी चार व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील दोन, कुडाळ तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २७६ असून, त्यापैकी २४० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
