करोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पण सकारात्मक मानसिकता ठेवली, तर प्रत्यक्ष करोनाशी लढा देणे कठीण नाही. कसे, ते सांगणारा करोनामुक्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जोडप्याचा हा अनुभव.
…..
आम्ही दोघे पतिपत्नी नुकतेच करोनामुक्त झालो आहोत. सगळ्यांच्या शब्दशः जिवावर उठलेल्या करोनाची लागण झाल्यापासून ते त्यातून मुक्तता होईपर्यंत आलेला अनुभव सांगण्यासाठी हा लेख लिहिला आहे. मी डॉक्टर नाही, तसेच याविषयी लिहिणारी कोणीही अधिकारी व्यक्ती नाही; पण आम्ही दोघेही (मी आणि नितीन) करोना पॉझिटिव्ह निघालो होतो काही दिवसांपूर्वी. आम्ही कोकणातील स्वर्गात राहतो, आम्हाला काही धोका नाही, असा आमचा समज होता. तरीही आम्हाला करोनाची बाधा झाली. कारण आम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी मुंबईत गेलो आणि अतोनात काळजी घेऊनही येताना हे गिफ्ट घेऊन आलो, हे पहिल्यांदाच स्पष्ट करते. आम्ही मुंबईतून आल्यावर १४ दिवस विलगीकरणामध्ये राहिलो (ज्यामध्ये आठव्या दिवशीच आम्हाला करोना डिटेक्ट झाला.) घरातील ज्येष्ठ, ९२ वर्षांचे सासरे, ८९ वर्षांच्या सासूबाई आणि ६५ वर्षांची वहिनी, तसेच घरातील काम करणारे सहकारी यांना याची बाधा झाली नाही, हे विशेष नमूद करण्यासारखे आहे.
करोना झाला, तो कसा झाला आणि कसे आम्ही यामधून बाहेर पडलो, यावर सविस्तरपणे मी लिहिणार आहेच; पण प्रचंड घाबरलेले वातावरण, करोना झाला की मृत्यू अटळ आहे, वगैरे बघता आम्हा दोघांना चांगली बातमी द्यावी किंवा शेअर करावी, असे वाटले म्हणूनच अगदी थोडक्यात सांगणार आहे. ज्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावा, हीच इच्छा आहे.
सर्वप्रथम हे स्पष्ट करते हा आमचा अनुभव आहे. कोणालाही क्रॉस करण्याचा आमचा विचार नाही. आम्ही कोकणात राहत असल्याने आमची सर्व व्यवस्थाही रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली. आपल्या मनात सिव्हिल हॉस्पिटल म्हटले, की खूप भयप्रद विचार असतात, तर तसे न होता रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलने आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. खूप चांगली ट्रीटमेंट, खूप चांगला आणि नम्र स्टाफ, तसेच डॉक्टर्स हे आमच्यासाठी अनपेक्षित होते. आमची टेस्ट, आमची ट्रीटमेंट सर्व म्हणजे सर्व हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाले. कोकणात खासगी डॉक्टरांना परवानगी नाही. आम्ही शंका आल्यावर आपणहून टेस्ट करायला गेलो आणि पॉझिटिव्ह आल्यावर सिव्हिल हॉस्पिटलची अॅम्ब्युलन्स येऊन आम्हाला अॅडमिट करायला घेऊन गेली. मुळात मी asymptomatic covid patient (लक्षणे नसलेली करोना रुग्ण) होते. मला फार गंभीर लक्षणे नव्हती. नितीनला थोडा ताप आणि खोकला होता. आम्ही अंगावर न काढता लगेच टेस्ट केली, म्हणून काहीही गंभीर न होता सहीसलामत बाहेर पडलो यातून, हे सर्वांत महत्त्वाचे; पण या सगळ्याला जोड म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे – पॉझिटिव्हिटी किंवा करोनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आपण यातून बाहेर पडणार आहोत, आपल्याला काहीही झालेले नाही ही ती पॉझिटिव्हिटी, जी आपल्याला कुठल्याही आजारातून बाहेर पडायला खूप मदत करते. आम्हाला तरी खूप मदत झाली या पॉझिटिव्हिटीची. आता विचाराल की हॉस्पिटलमध्ये काय ट्रीटमेंट मिळाली, तर खरे सांगायचे तर करोनावर औषध अजूनही नाही. त्यामुळे काहीही ट्रीटमेंट अशी नव्हती. मला व्हिटॅमिन सीच्या, बीकॉसुल झिंकच्या गोळ्या आणि नितीनला याबरोबर अँटिबायोटिक पाच दिवस. अर्थात हे सर्व डॉक्टरांच्या देखरेखीखाली हे महत्त्वाचे. बस्स! एवढंsच!
याबरोबर आम्ही गरम पाणी पिणे, वाफारा घेणे, प्राणायाम यांसारख्या गोष्टी घरातही करत होतो. ते हॉस्पिटलमध्येही चालू ठेवले होते. अर्थात आम्ही काही खूप आजारी नव्हतो म्हणूनही असेल कदाचित, आम्हाला खूप औषधे नव्हती; पण वेळीच आणि योग्य उपचार केले किंवा मिळाले तर हा पण एक नेहमीच्याच ताप-सर्दीसारखाच आजार आहे, असे आम्हांला दोघांना वाटते. ज्यांना काही गंभीर आजार आधीच आहेत किंवा ज्यांना डायबेटिस, बीपी, हार्ट ट्रबल आहे किंवा लठ्ठपणा आहे, त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, हे लक्षात घ्या. ज्याला असे काहीही नाही, त्यांनी पण काळजीही घ्यायलाच हवी; पण जास्त धोका वरील आजार असणाऱ्या लोकांना आहे, हेही लक्षात घ्या. पण तरीही या सगळ्या आजारपणानंतर आमच्या दोघांचा पॉझिटिव्हिटीवर खूप विश्वास बसला आहे, हे मात्र खरे. मनाने खंबीर आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी करोनावर मात करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आम्ही ११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहून घरी १४ दिवस विलगीकरणामध्ये राहिलो आहोत. जे काही झाले त्याने थोडाफार अशक्तपणा आला होता, तो पण कमी व्हायला सुरुवात झाली आहे.
आता यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील, पण आम्ही जे अनुभवले ते शेअर करावे असे वाटले. आता यावर तुम्ही म्हणाल, की जे आकडे करोनामुळे गेल्याचे किंवा सिरीयस झाल्याचे दाखवतात ते कसे? तर तो एक वेगळा विषय आहे. आत्ता फक्त जर कोणाला करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर घाबरून न जाता आपण काय करू शकतो हेच शेअर करायचे होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्याला करोना होतो, त्याला आजूबाजूच्या लोकांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याला हा आजार झालाय, त्याला पॉझिटिव्हिटी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाळीत न टाकता मदत करणे गरजेचे आहे. आता यावर असे म्हणू नका, की डॉक्टर काहीच करत नाहीत का? फक्त पॉझिटिव्ह अॅटिट्यूडच मदत करतो का? तर नीट वाचा. डॉक्टरांच्या औषधोपचारांबरोबरच घाबरून न जाता हेही गरजेचे आहे, असे म्हटलेले आहे. अति चर्चिला गेलेला करोना कोणाला झाला, तर घाबरून न जाता त्याला कसे तोंड द्यावे, याबद्दल लिहिणे हा या लेखाचा उद्देश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांनीच आपापली मानसिक तयारी करून ठेवावी. हा आपल्याला होणार आहे याबद्दल आणि मग जेव्हा केव्हा कोणाचे निदान झाले तर चांगले विचार ऐकून किंवा ऐकवून कोणाचा फायदा होत असेल तर काय हरकत आहे! करोना नाही झालाच तर आनंद आहेच की!
- मथितार्थ असा, की
- १. करोना डिटेक्ट झाला तरीही घाबरून जाऊ नका. सगळ्याच लोकांना एकदम अतिदक्षता, ऑक्सिजन द्यायला लागतोच असे नव्हे
- २. आपल्या डोक्याने औषधे न घेता नीट उपचार डॉक्टरी सल्ल्यानुसार घ्या.
- ३. एखाद्या कुटुंबांमध्ये असा पेशंट निघाला, तर बाकी सगळ्यांनी घाबरून न जाता टेस्ट करून घ्या.
- ४. जो करोना पेशंट आहे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आजूबाजूच्या लोकांनी मानसिक आधार देणे अत्यंत गरजेचे आहे, ५. शक्य असल्यास ऑक्सिजन लेव्हल तपासत राहा.
- ६. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या उपायांनी अपाय होणार नाही, असे उपाय – जसे की वाफ घेणे, गुळण्या करणे, गरम पाणी पिणे, हात वारंवार धुणे, इत्यादी उपाय करत राहा.
- ७. अतिमहत्वाचे म्हणजे ज्याला करोना झाला असेल, त्याने स्वतःची स्वतः मानसिक ताकद मजबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आजूबाजूचे मदत करतील; पण आपणच जर खचून गेलो तर कोणीही कितीही मदत केली तरी निष्फळ असेल.
यावर आमच्याशी बोलायचे असल्यास आम्हाला नेटवर्क नसल्याने व्हॉट्सअॅपद्वारे बोलू शकता. कृपया फोन करू नका. गैरसमज नकोत. आमचे फोन मुंबईमध्ये डायव्हर्ट असल्याने ज्यांच्याकडे डायव्हर्ट आहेत, त्यांना त्रास नको ही इच्छा.
हे सगळे वाचून झाल्यावर आमच्या या लेखावर प्रतिक्रियाही नकोत. कारण आम्ही कुठलाही दावा केलेला नाहीये. ज्यांना पटणार नाही त्यांनी सोडून द्यावे. आम्ही आमचा फक्त अनुभव कथन केला आहे.
शिवाय आम्ही गेला महिनाभर रत्नागिरीतील वैद्य आशुतोष गुर्जर यांचे औषध (काढा) घेत आहोत. त्याचे चांगले परिणाम पण बघत आहोत. मुळात त्यांचे शांतपणे बोलणे आणि समोरच्याला ‘तुम्ही बरे व्हाल, काहीही झाले नाहीये तुम्हाला,’ हा आत्मविश्वास देणे अर्ध्याहून अधिक औषध घेतल्याशिवायच बरे करते. आमच्या पूर्ण करोना आजारामध्ये त्यांची आम्हाला खूप साथ मिळाली. दररोज सकाळी आठ वाजता न चुकता आम्हाला दोघांना त्यांचा फोन येत असे. खरोखरच अगदी आपल्या कुटुंबाची करावी, तशी काळजी आमची त्यांनी घेतली. त्यांना शतशः धन्यवाद ….. आणि हो, त्यांनी दिलेला काढा आम्हीही घेतोय सगळे जण!
लेख आवडल्यास नावासकट शेअर करायला हरकत नाही.
- सौ. शिल्पा नितीन करकरे,
तुरळ, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
(Whatsapp No. 9892584332)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
