कोकणातील तरुणांनी विकसित केले ऑनलाइन शिक्षणाचे सुलभ अॅप

रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाचा बोलबाला सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, तसेच नव्याने जाहीर झालेल्या शैक्षणिक धोरणाला पूरक असे एक अॅप मूळच्या कोकणातील दोघा तरुणांनी विकसित केले आहे. प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर स्तरापर्यंत प्रामुख्याने ग्रामीण भागातील गैरसोयी लक्षात घेऊन शैक्षणिक विकासात मोलाची भर घालू शकेल, असे हे अॅप असून, सिद्धार्थ पाथरे आणि सौरभ सुर्वे या दोघा इंजिनीअर तरुणांनी तयार केले आहे. त्यापैकी सिद्धार्थ पाथरे हा तरुण तर आपल्या ज्ञानाचा भारतीयांना फायदा व्हावा, यासाठी अमेरिका सोडून भारतात परतला आहे.

सिद्धार्थ पाथरे मूळचा चिपळूणचा असून, तो नंतर पुण्यात स्थायिक झाला. मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी तो अमेरिकेत गेला; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्याने अमेरिकेतून भारतात येण्याचा निर्णय घेतला. सौरभ सुर्वे (तुळसणी, ता. संगमेश्वर) या ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग केलेल्या तरुणाशी त्याची भेट झाली आणि त्या दोघांनी वेगळे काही तरी करायचे ठरवले. त्यातूनच क्लेव्हरग्राउंड (CleverGground ) या अॅपची निर्मिती झाली. अमेरिकेत असताना सिद्धार्थने तेथील ऑनलाइन शिक्षण पद्धती पाहिली होती. त्या तुलनेत भारतातील ऑनलाइन शिक्षण अगदीच प्राथमिक अवस्थेत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

भारतात पेपवर्कवर भर दिला जातो. अमेरिकेत पेपरवरर्क होतच नाही. हा फरक जाणवल्यानंतर, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या इंटरनेटसह इतर समस्या लक्षात घेऊन नवे अॅप विकसित करण्यात आले. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी कंपनी सुरू करण्यात आली. त्याच दरम्यान करोनाप्रतिबंधक लॉकडाउन सुरू झाले आणि ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व सर्वांच्याच लक्षात आले आणि नव्या अॅपला चांगला प्रतिसाद मिळू लागला. ऑनलाइन शिक्षणासाठी झूमपासून अनेक अॅप्स गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत; पण इंटरनेटअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येतात. शिवाय झालेले लेक्चर पुन्हा पाहून शंकानिरसन करणे विद्यार्थ्यांना कठीण होते. अशा वेळी हे अॅप नक्कीच फायदेशीर ठरते.

इंटरनेट समस्या असल्यास या अॅपमध्ये विद्यार्थी लेक्चर डाउनलोड करून ऑफलाइन पाहू शकतो. विद्यार्थ्याने लेक्चर किती वेळा पाहिले, हेदेखील शिक्षकांना कळते. लेक्चर रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना पाठवतादेखील येते. मुलांना नोट्स पाठवणे, गृहपाठ पाठवून ते तपासणे, ऑनलाइन एमसीक्यू अर्थात बहुपर्यायी प्रश्न विचारणे अशी कामेदेखील या माध्यमातून करता येतात. हे प्रश्न आपोआप तपासले जाऊन त्याचे मार्क्स पालक आणि विद्यार्थ्यांनादेखील कळतात. शिवाय ऑनलाइन अॅडमिशनचा विचार करता प्रवेश प्रक्रिया, हजेरी, प्रगतीपुस्तक इत्यादी गोष्टीदेखील ऑनलाइन पाहता येतात.

सध्या राज्यभरातून या अॅपला प्रतिसाद वाढला आहे. सध्या चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पुण्यासह राज्यभरातील शंभरपेक्षा अधिक शैक्षणिक संस्था, तसेच खासगी क्लासेसमध्ये क्लेव्हरग्राउंड अॅपचा वापर केला जात आहे. अॅपचा वापर करणाऱ्या सुमारे ९० विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कमालीची वाढ झाली आहे. लोकल फॉर व्होकल, मेक इन इंडिया या उपक्रमांचा फायदा नक्कीच होणार असल्याचे पाथरे आणि सुर्वे यांनी सांगितले. आपल्या माणसांकरिता काहीतरी करता येत असल्याचे समाधान वाटत असल्याचेही ते म्हणाले.

शाळा आणि शैक्षणिक संस्थांना त्यांच्या गरजेनुसार सॉफ्टेवेअर तयार करून दिले जाते. मुलांना त्यात सहभागी कसे करून द्यायचे, वगैरेचे प्रशिक्षण दिले जाते. एका विद्यार्थ्यामागे वर्षभरासाठी अगदी शंभर रुपयांपर्यंतच खर्च येतो. गावापर्यंत पोहोचणे हा त्याचा मूळ उद्देश असल्याचे सिद्धार्थ पाथरे याने सांगितले. पहिलीपासून ते इंजिनीअरिंगपर्यंतच्या कोणाही विद्यार्थ्याला अॅप उपयुक्त ठरू शकते. त्याचाच वापर करून पुढच्या काळात करिअर गायडन्स, स्किल डेव्हलपमेंटसारखे उपक्रम राबविले जाणार असून, केंद्र सरकारने नव्याने जाहीर केलेल्या शैक्षणिक धोरणासाठी हे अॅप खूपच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास सिद्धार्थ पाथरे (9325215681) आणि सौरभ सुर्वे (9356461005) या दोघा तरुणांनी व्यक्त केला.
वेबसाइट : https://www.cleverground.com/
……

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

प्रोफिशियंट अॅकॅडमीच्या वेबसाइटला नक्की भेट द्या : https://bit.ly/30tD3uz

Leave a Reply