रत्नागिरी : आज (ता. १०) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोघा करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये खेडशी (ता. रत्नागिरी) आणि वांद्री (ता. संगमेश्वर) येथील व्यक्तींचा समावेश आहे. या मृतांमुळे जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या ८० वर पोहोचली आहे. कालपासून ७७ नवे करोनाबाधित सापडल्याने एकूण बाधितांची संख्या दोन हजार २९० झाली आहे. आतापर्यंत १५६८ जण करोनामुक्त झाले असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्के असल्याचे जिल्हा रुग्णालयातर्फे देण्यात आलेल्या अहवालात नमूद केले आहे.
काल सायंकाळपासून ७७ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२९० झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – रत्नागिरी २२, दापोली ४, कळंबणी १६, गुहागर ३, कामथे २, देवरूख ३, रायपाटण ५, अँटिजेन २२.
आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून ४, कळंबणीतून १, कोव्हिड केअर सेंटर, वेळणेश्वर, गुहागर येथून ४, कामथे १, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा १० अशा २२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेले ५२ आणि परजिल्ह्यात उपचारासाठी गेलेले पाच रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार ५६८ झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये सध्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह ६४२ रुग्ण आहेत.
आज मिळालेल्या माहितीनुसार दोघे करोनाबाधित रुग्ण उपचार सुरू असताना मरण पावले. खेडशी (ता. रत्नागिरी) येथील एका ५५ वर्षीय वयाच्या व्यक्तीचा अहवाल ॲन्टिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा मृत्यू झाला. वांद्री (ता. संगमेश्वर) येथील ५७ वर्षीय रुग्णाचाही आज मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता ८० झाली आहे.
नवी करोनाबाधित क्षेत्रे
आज सौभाग्यनगर, नाचणे, मौजे रवींद्रनगर, कुवारबाव, शिवशक्ती अर्पाटमेंट टीआरपी नाचणे, ब्राह्मणवाडी, गावखडी, घाणेकरवाडी, अभ्युदयनगर, खेडेकर चाळ, स्वप्नलोक अपार्टमेंट एसटी स्टँडसमोर, सावंत प्लाझा, बोर्डिंग रोड, गोगटे महाविद्यालय महिला वसतिगृह ही क्षेत्रे करोनाबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात सध्या २४३ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, त्यांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी ४७ दापोली ९, खेड ६९, लांजा ४, चिपळूण १००, मंडणगड १, राजापूर ४, संगमेश्वर २, गुहागर ७.
संस्थात्मक विलगीकरणात सध्या १५१ जण आहेत. त्याचे विवरण असे – जिल्हा रुग्णालय ४१, समाजकल्याण भवन, रत्नागिरी ६, उपजिल्हा रुग्णालय, कामथे ५०, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी २१, कोव्हिड केअर सेंटर, घरडा ४, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे – ७, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली २०, गुहागर १, पाचल १.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींच्या संख्येत आजही वाढ झाली. आजअखेर ४७ हजार ५५० जण होम क्वारंटाइनखाली आहेत. परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात कालपर्यंत एकूण दोन लाख ६३ हजार ५६७ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या एक लाख १५ हजार ५८० आहे.


