रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी सात करोनाबाधितांचा मृत्यू; सिंधुदुर्गात एकाच दिवशी ३० नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१५ ऑगस्ट) एकाच दिवशी करोनामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यातील चौघे जण कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात, तर इतर तिघे जण रत्नागिरीच्या जिल्हा कोविड रुग्णालयात मरण पावले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवसात ३० रुग्णांची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती
चिपळूण तालुक्यातील खेंड येथील ६५ वर्षीय रुग्ण, डोकलवाडी येथील ६५ वर्षीय महिला, खेड तालुक्यातील भोस्ते येथील ६५ वर्षीय महिला, खेड येथील ५५ वर्षीय रुग्ण, लोटे येथील ७० वर्षीय रुग्ण, दाभोळ (ता. दापोली) येथील ७३ वर्षीय रुग्ण आणि गवळीवाडा, रत्नागिरी येथील ७२ वर्षीय करोनाबाधित रुग्ण यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या आता १०१ झाली आहे.

दरम्यान, आज ६६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी अॅन्टीजेन चाचणीत ४१, तर आरटीपीसीआर चाचणीत २५ जण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २७४७ झाली आहे. आज दाखल झालेल्यांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी २५, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी १८, राजापूर १, लांजा ५, संगमेश्वर ८, घरडा रुग्णालय ९.

आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून ३, कामथे रुग्णालय २ असे पाच, तर होम आयसोलेशनमधील एक रुग्ण बरा झाला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७८८ झाली असून, हे प्रमाण ६५ टक्के आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये ८५८ जण उपचार घेत आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५९८वर पोहोचली आहे. त्यापैकी ४११ जण बरे होऊन घरी गेले आहेत. ११ जणांचा मृत्यू झाला असून, १७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या जिल्ह्यात ६१ कंटेन्मेंट झोन आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply