रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आले. या आपत्तीच्या स्थितीतही शासन खंबीरपणे उभे आहे आणि या संकटावर मात करून जिल्ह्याला नव्याने उभे करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड अनिल परब यांनी आज (१५ ऑगस्ट) रत्नागिरीत केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७३वा वर्धापनदिनी आज जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री ॲड. परब यांच्या हस्ते रत्नागिरीतील पोलीस कवायत मैदानावर पार पडले. या वेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, जि. प. अध्यक्ष रोहन बने, सभापती बाबू म्हाप, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी, तसेच जि. प. सदस्य आणि नगरसेवकांचीही या वेळी उपस्थिती होती.
लॉकडाउनच्या काळात शासनाने वेगळ्या बदलांसह गरीब जनतेला धान्य पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडली आणि शासन खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी आहे हे दाखवले, असे ॲड. परब म्हणाले. निसर्ग चक्रीवादळाच्या काळात नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापासून सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केल्या व यात प्राणहानी होऊ नये याची खबरदारी घेतली, याबद्दल आपण प्रशासन, तसेच सहकार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे विशेष अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. चक्रीवादळाने बाधित झालेल्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरंभीच १०० कोटी जाहीर केले होते.
आपत्ती प्राधिकरणाचे नियम बदलून अधिकाधिक बाधितांना आर्थिक भरपाई मिळावी यासाठी शासनाने मदतीचे निकष बदलले, तसेच झाडनिहाय भरपाईचेही धोरण अंगीकारले. जिल्ह्यात आतापर्यंत ११६.९८ कोटी रुपये बाधितांसाठी आले आहेत. त्यातील ७७.३५ कोटी रुपये मदत स्वरूपात देण्यात आले असून, अतिरिक्त ७१.९९ कोटी रुपयांची मागणीदेखील शासनाच्या विचाराधीन आहे व ती देण्याची शासनाची भूमिका आहे, असे परब यांनी सांगितले.
आपण करोनाच्या संकटाचा मुकाबला करीत आहोत. यात सहकार्य करणाऱ्या व झोकून देऊन काम करणाऱ्या करोना योद्ध्यांचे आपण अभिनंदन करतो आणि शासनातर्फे आभार मानतो, असे पालकमंत्री या वेळी म्हणाले.
करोना काळात येणारा गणेशोत्सव आणि येणारे चाकरमानी यांचा विचार करून अनेक बाबी शासनाने केल्या आहेत. सर्वांनी सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर या नियमांचे पालन करून उत्सव आरोग्य शिबिरे व उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या सहकार्यातून गणरायाच्या कृपेने आपण या संकटावर मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आत्मनिर्भर भारताचा विचार सर्वांनी केला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, की निसर्गाने रत्नागिरीला सुंदर अशा सागरकिनाऱ्यांची देणगी दिली आहे. येणाऱ्या काळात गणपतीपुळे, आरे-वारे येथे स्थानिकांना संधी निर्माण करून देण्याचे काम पर्यटन विभाग आणि एमटीडीसीच्या माध्यमातून केले जाईल.
ध्वजारोहण झाले, त्या वेळी पावसाची जोरदार सर आली होती. त्या मुसळधार पावसातही ध्वजारोहण झाले. यानंतर पालकमंत्र्यांना पोलीस दलातर्फे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी करोनाच्या बाबतीत उल्लेखनीय काम करणारे अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्रामपंचायतींचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.