मालवण : काल (ता. २६) पाच दिवसांच्या गणपतीबाप्पांचे विसर्जन मालवण येथे झाले. त्यानंतर काठावर आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे मालवण नगरपालिकेकडून पुन्हा एकदा खोलवर विसर्जन करण्यात आले.
मालवणमधील देउळवाडा येथे विसर्जन केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आज पाण्यावर तरंगताना दिसून आल्या. याबाबत काही नागरिकांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना माहिती देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली. नगराध्यक्षांनी तातडीने पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या मूर्ती काही अंतरावर खोल पाण्यात पुन्हा विसर्जित केल्या.
मालवणमध्ये अनेक ठिकाणी परंपरेनुसार गणपतीबाप्पांचे विसर्जन होते. देऊळवाडा येथेही मोठ्या संख्येने बाप्पांचे विसर्जन होते. पालिकेने तेथे विसर्जनासाठी चांगली व्यवस्थाही केली होती. काल पाच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन तेथे झाले. शाडूमातीच्या मूर्ती पाण्यात पूर्ण बुडाल्या, विरघळल्या; मात्र पीओपीच्या मूर्ती पाण्यात पूर्णपणे बुडाल्या नाहीत. काही मोठ्या मूर्तींचे मुकुट पाण्यावर दिसत होते, तर काही मूर्ती तरंगत होत्या. याबाबत माहिती मिळताच कांदळगावकर, तसेच पालिका कर्मचारी विजय खरात, रमेश कोकरे, कृष्णा कांबळे आणि पथक देऊळवाडा येथे तत्काळ दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी तीन ते पाच फूट पाण्यात उतरून पाण्यावर दिसणाऱ्या आठ ते १० मूर्ती खोल पाण्यात नेऊन विसर्जित केल्या.
दरम्यान, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असल्यास काही अंतर पुढे जाऊन खोल पाण्यात त्यांचे विसर्जन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड