देवरुख : करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव भाविकांनी अत्यंत साधेपणाने आणि नियम व अटींचे पालन करून साजरा केला. देवरुखात आज (२७ ऑगस्ट) पाच दिवसांच्या गणपतींना, तसेच गौरींनाही शांततेत निरोप देण्यात आला. देवरुख परिसरात १२ हजार व संगमेश्वर परिसरात १३ हजार घरगुती गणेशमूर्तींचे आज विसर्जन झाले. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)
यंदा देवरुख नगरपंचायतीने देवरुख प्रभागातील नागरिकांना गणेशमूर्ती नगरपंचायतीकडे आणून देण्याचे आवाहन केले होते. वाहनांची व्यवस्थाही करण्त आली होती, तसेच काही कृत्रिम तलावही तयार करण्यात आले होते; मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. भाविकांनी नदीत गणेशमूर्ती विसर्जित करण्याला प्राधान्य दिले.
खालची आळी नदीघाटावर पोलिसांसह खालची आळी श्री सत्यनारायण बालमित्र समाजाचे २५ कार्यकर्ते, नगरपंचायत कर्मचारी आणि आपत्कालीन विभागातील प्रशिक्षित कर्मचारी मदतीला होते. शाळा नं. १जवळ अण्णा बेर्डे, राजा गायकवाड मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक सेवा देत होते. विविध ठिकाणच्या नदीघाटांवर देवरुख नगरपंचायतीने आपले कर्मचारी तैनात ठेवले होते व निर्माल्यकलशही ठेवले होते. ठिकठिकाणी नियमावलींचे फलकही नगरपंचायतीने लावले होते.
विसर्जनस्थळी पोलीस कुटुंबातील दोनच व्यक्तींना आत सोडत होते. यामुळे नदीघाटावर गर्दी झाली नाही. तसेच निर्माल्यही नदीत टाकले गेले नाही. विसर्जन मिरवणुका न निघाल्यामुळे ढोल-ताशांच्या गजर नव्हता; पण ‘बाप्पा मोरया’चा गजर ऐकायला मिळाला.
गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजीही झाली नाही. शासनाचे नियम पाळून भाविकांनी गणरायाची मनोभावे सेवा करून करोना संकटाचे निवारण करण्याचे साकडे घातले.