रत्नागिरी होणार पहिला नवप्रवर्तन जिल्हा; सिंधुदुर्गात तीन वर्षांत ताज ग्रुपचे हॉटेल

रत्नागिरी : ‘रत्नागिरी जिल्हा उद्योगाच्या दृष्टीने राज्यात अग्रेसर ठरावा, यासाठी तो इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट म्हणजेच नवप्रवर्तन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या तीन ते चार महिन्यांत तयार करण्यात येणार आहे,’ अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (२७ ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या तीन वर्षांत फाइव्ह स्टार हॉटेलच्या पहिल्या टप्प्यातील १२० खोल्या उभारण्याबाबतचा सामंजस्य करार आज झाल्याचेही त्यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, ‘नवप्रवर्तन जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात नावीन्यपूर्ण प्रदूषणविरहित कारखाने उभारण्याच्या दृष्टिकोनातून यंत्रणा उभारली जाणार आहे. जिल्ह्यात जेथे जागा मिळेल तेथे, तसेच जिल्ह्यातील एमआयडीसीतील भूखंड उपयोगात आणून वेगवेगळ्या प्रकारची कारखानदारी, पर्यावरणपूरक कारखानदारी आणण्याबाबत विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी’चे संचालक श्री. जगदाळे हा अहवाल तयार करणार आहेत. तो केल्यानंतर जगभरातील शंभर देशांमधील अडीच हजार वैज्ञानिक, संशोधक या जिल्ह्यात संशोधन करू शकतील. उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण घेतलेल्या एक लाखापेक्षा अधिक तरुणांना नोकऱ्या मिळतील, अशी रचना करण्यात येणार आहे. उद्योगांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने संशोधन केंद्रे, आंतरराष्ट्रीय संशोधन विद्यापीठ, शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये मातृभाषा सक्तीची असेल.’

‘रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाणार आहे. त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, हा उद्देश आहे. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याची संकल्पना घेऊन कामकाज केले जाणार आहे. कोकणातील नैसर्गिक संपत्तीचा पर्यटनदृष्ट्या वापर झाला नसेल, त्याचा वापर करतानाच रोजगार उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाईल. कोकणात परदेशातील शास्त्रज्ञही या भागात आकर्षित व्हावेत, या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे,’ असे श्री. सामंत यांनी सांगितले.

सिंधुदुर्गातील ताज ग्रुपचे हॉटेल तीन वर्षांत
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनविकासाच्या दृष्टीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने काही निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘१९९४ साली ताज ग्रुपला ५४ एकर जागा देण्यात आली होती. तेथे येत्या तीन वर्षांत फाइव्ह स्टार हॉटेलच्या पहिल्या टप्प्यातील १२० खोल्या उभारण्याबाबतचा सामंजस्य करार आज (२७ ऑगस्ट) झाला आहे. त्यासाठी ताज ग्रुप १०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

‘कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मारकासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून पैसे वर्ग झाले असून जागेचा प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना तेथील जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे,’ असे सामंत यांनी सांगितले.
‘कोकणातील महत्त्वाकांक्षी बीच शॅक्स संकल्पनेच्या पायलट प्रोजेक्टला आज मूर्त स्वरूप मिळाले असून प्रत्येक बीचवर १० शॅक्ससाठी आज निविदाप्रक्रिया सुरू झाली आहे,’ असेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तारही उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply