अंतिम वर्षाची परीक्षाप्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची सर्व प्रक्रिया येत्या ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आज (तीन सप्टेंबर) मुंबईत राजभवनात झालेल्या सर्व कुलगुरूंच्या बैठकीतील निर्णयाची माहिती त्यांनी दिली.

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज मुंबईत राजभवनात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक झाली. यावेळी श्री. सामंत यांच्याबरोबरच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भातील समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार येत्या १५ सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू करून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भातील चर्चा बैठकीत झाली. त्याचा अहवाल अॅकॅडमिक कौन्सिल आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोवर ठेवून दोन दिवसांत शासनाला कळवावे आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक येत्या मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचित करण्याची सूचना राज्यपालांनी केली. परीक्षा पद्धतीसंदर्भात विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये परीक्षेसंदर्भातील समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी, असेही राज्यपालांनी सांगितले.

याबाबतची माहिती देताना श्री. सामंत म्हणाले, राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ ची सद्यस्थिती आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल.

बैठकीत विद्यापीठांनी परीक्षाप्रक्रिया कशी पूर्ण करावी, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्यासंदर्भातील तयारी कशी करावी, याबरोबरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थांच्या परीक्षेचेसुद्धा नियोजन करण्यात यावे, याबाबत चर्चा करण्यात आली, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply