मुकुल माधव फाउंडेशनच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन संचालित मुकुल माधव कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन २८ सप्टेंबर रोजी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा आणि जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते एका छोट्या समारंभात झाले. करोनासंबंधीचे सर्व नियम पाळून हा सोहळा पार पडला.

‘प्रत्येकामध्ये आपल्या स्वप्नपूर्तीचे सामर्थ्य असते. परिस्थितीशी जुळवून घेताना तुम्ही कसे सामोरे जाता आणि विचार करता, यावर तुमचे यशापयश अवलंबून असते. ‘मला हे जमेलच’ अशा आत्मविश्वासाने आपण कार्यरत राहिलो तर यश हमखास मिळते. रोज नवीन एक गोष्ट शिकली पाहिजे. नियोजनपूर्वक मेहनत केली, तर तुमची स्वप्नपूर्ती निश्चित होते,’ असे मत शिल्पाताई पटवर्धन यांनी या वेळी व्यक्त केले.

या वेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक संजय मठ, अॅड. रुची महाजनी, श्री. काकडे, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. रत्नागिरी-पावस मार्गावर असलेल्या मुकुल माधव विद्यालयाच्या माध्यमिक शालान्त परीक्षेत मिळालेल्या १०० टक्के यशानंतर शिक्षणाचा हा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने हे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.

‘रत्नागिरीमधील ग्रामीण भागात पुण्या-मुंबईच्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शालान्त स्तरावर मुकुल माधव विद्यालयाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. आता कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरही येथील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग पुरवून गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे,’ अशी भावना मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या ऑनलाइन वर्गांचे वेळापत्रक ठरविण्यात आले. २९ सप्टेंबर २०२०पासून विज्ञान आणि वाणिज्य या शाखांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू होतील. या वेळी विद्यार्थ्यांनी येथील इमारती, पायाभूत सुविधा आदींबाबत आनंद व्यक्त करत व्यवस्थापनाचे आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply