
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा पाचवा लेख… नाटककार ल. मो. बांदेकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे सुजाता टिकले यांनी…
………
सावंतवाडीतील नाटककार ल. मो. बांदेकर म्हणजे लक्ष्मण मोतीराम बांदेकर हे संपूर्ण कोकणातच नव्हे, तर कोकणाच्या बाहेरही ‘आर्यचाणक्य’कार म्हणून परिचित होते. ते मराठीतील एक नामवंत नाटककार होते. ‘लमों’चे वडील नाट्यवेडाने झपाटलेले होते. त्यांच्यासोबत वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून ‘लमो’ नाटके पाहू लागले. राम गणेश गडकरी यांच्या नाटकांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला. गडकऱ्यांची नाटके ‘लमों’ना मुखोद्गगत होती. ‘लमों’मध्ये राम गणेश गडकरी संचारले ते त्यांच्या वडिलांच्या नाट्यवेडामुळे.
वाडीच्या केशवसुत कट्ट्यावर लमो, जनार्दन पोकळे, दिनकर धारणकर ही सारी मंडळी जमत, तेव्हा लमो गडकऱ्यांच्या नाटकातले उतारेच्या उतारे हातवारे करत साभिनय म्हणून दाखवायचे. ‘लमों’च्या नाटकांनी ‘नाट्यदर्शन’ या सावंतवाडीतील मान्यवर नाट्यसंस्थेतील कलावंतांची पिढी घडली.
सावंतवाडीच्या जिल्हा बँकेत नोकरी करताना त्यांनी लेखनवेड जोपासले आणि फुलवले. दिनकर धारणकर हा अट्टल नाट्यवेडा माणूस त्यांच्या जीवनात आला आणि ‘लमों’चे नाट्यलेखन अधिकच बहरले. दिनकर धारणकर हे अत्यंत कल्पक नाट्यदिग्दर्शक. त्यांची दृष्टीही व्यापक होती. लमो त्यांना गुरू मानीत.
‘नसानसात नाटक भिनलेले लमो’
दिनकर धारणकर दिग्दर्शक, तर ल. मो. बांदेकर नाटककार. या दोघांच्या मैत्रीचे कौतुकास्पद रसायन होते. बांदेकर नाटक लिहायचे आणि धारणकर सादरीकरण करायचे. हे दोघेही प्रथम माणूस व नंतर कलाकार होते त्यामुळे त्यांना कलाकारांची पारख होती. या दोघांनीही जीवनात व नाट्यकला क्षेत्रात मैत्री द्विगुणित केली. मनात आलेल्या प्रत्येक विषयाशी संबंधित संपूर्ण माहिती घेणे, कच्चा खर्डा करण्यापासून ते अंतिम ड्राफ्ट, परिपूर्ण संहिता लिहून हातावेगळी करेपर्यंत बांदेकर अक्षरशः झपाटलेले असत. संवादामध्ये मनासारखा अपेक्षित परिणाम मिळेपर्यंत ते सतत शब्दांची उलथापालथ करत असत.
जिल्हा बँकेतील आपले काम आटोपले, की ते वाचनात गढून जात. भल्याभल्यांना माहीतसुद्धा नसलेल्या विषयांचे त्यांचे दांडगे वाचन होते. ‘लमों’ना सतत प्रेरणा देणे व त्यांच्याकडून नवनवीन संहिता लिहून घेण्याचे मोठे श्रेय दिनकर धारणकर यांनाच आहे. धारणकर जाणकार नाट्यकर्मी होते. वाङ्मयाची उत्तम जाण त्यांना होती. प्रत्येक विषयातील नाट्य सतत पाहण्याची त्यांची वृत्ती होती. हे दोघे म्हणजे नाट्य या विषयातील राम-लक्ष्मणाची जोडी होती.
‘कोकणचे छोटे गडकरी’
‘लमों’नी १८८५ ते १९४० या कालखंडातील २० निवडक ऐतिहासिक, सामाजिक, संगीत नाटकातील भागांची एकत्रित गुंफण करून ‘रंगदर्शन’ हा अभिनव कार्यक्रम सादर केला. महाभारतातील सहा स्त्रियांचे स्वगत असलेली व्यासकन्या नावाची संहिता त्यांनी लिहिली. तिचं पहिलं वाचन सावंतवाडीतील ‘इनरव्हील क्लब’च्या निवडक महिलांसमोर झालं, तेव्हा त्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातल्याच एक सभासद कवयित्री उषा परब यांनी संध्या वझे, दर्शना रासम, वैशाली पंडित, मृणालिनी कशाळीकर, आरती कार्लेकर या आपल्या पाच सहकाऱ्यांसह ही व्यक्तिचित्रे नाट्यरूपात सादर करण्याचा संकल्प करून त्याचा एक प्राथमिक प्रयोगही केला.
राम गणेश गडकरी यांना मराठीतले ‘शेक्सपिअर’ असे म्हटले जाते आणि लमो बांदेकरांना ‘कोकणचे छोटे गडकरी’. ‘लमों’च्या लेखनावरील गडकरींच्या प्रभावामुळे आणि नाटकातील त्यांचे भरजरी भाषावैभव ऐकून सावंतवाडीचे डॉक्टर श्रीपाद कशाळकर यांनी ‘छोटा गडकरी’ ही उपाधी त्यांना दिली होती.
‘लमों’ची साहित्यसंपदा
‘किंग लियर’ हे शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’इतकेच जबरदस्त नाटक. कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’चे कथाबीज ‘किंग लियर’वरून आलेले. सावंतवाडीची ‘नाट्यदर्शन’सारखी संस्था व दिनकर धारणकर यांच्यासारखा दिग्दर्शक या बळावर ‘लमों’नी शेक्सपिअरचा किंग ‘लियर’ पेलण्याचे ठरविले आणि ‘किंग लियर’वरच बेतलेले ‘सेकंड लियर’ असे नाटक लिहिले. सुंदरवाडीचे धारणकर यांचे शिष्य जनार्दन पोकळे यांनी ‘सेकंड लियर’मध्ये एडमंडची खलनायकाची भूमिका प्रभावी केली होती. या नाटकाचा पहिला प्रयोग मे १९९१मध्ये ‘नाट्यदर्शन’ने केला.
‘अंबा’ ही महाभारतात अत्याचाराच्या विरुद्ध पेटून उठलेली स्त्री. म्हणूनच हा पौराणिक विषय हाताळायचे ठरवून ‘लमों’ची अंबा रंगमंचावर अवतरली. बांदेकरांची ‘अंबा’ ही सूडकथा आहे. पार इंदूरपर्यंत तिचे प्रयोग झाले. ‘शून्यनायक’ हे शोकात्म नाटकही ‘लमों’नी लिहिले होते. ‘चक्रव्यूह’, ‘लीला गौरीहराच्या’, ‘केला कलकलाट काकांनी’ ‘पुत्रवती मी संसारी’ (अभोगी), ‘सोनेरी सकाळ’, ‘पुरुषार्थ’, ‘कुंभ अमृताचा’, ‘ऑथेल्लो दी सेकंड’ यांसारख्या नाटकांची निर्मिती देखील त्यांनी केली होती. ‘ऑथेल्लो दी सेकंड’ हे ‘लमों’च्या नाटकाचं शीर्षक नाटकाच्या आशय विषयाला अगदी चपखल बसतं. आशयपूर्ततेसाठी त्यांनी अन्य नाटकातील प्रवेशांचा, स्वगतांचा व गीतांचा साधनासारखा वापर केला. म्हणूनच हे नाटकही नाटकातूनच उमलत असलं, तरी ते पारंपरिक लोकप्रिय नाटकांच्या साच्यातून घडवल्यासारखं वाटतं.
‘आर्यचाणक्य’कार म्हणून प्रसिद्धी
नाटककार ल. मो. बांदेकर यांचं गाजलेलं नाटक म्हणजे ‘आर्यचाणक्य.’ सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी या भारतवर्षात उठलेलं एक प्रचंड वादळ म्हणजे आर्य चाणक्य. या चक्रीवादळाच्या भैरवनृत्याची मोट ‘लमों’नी दगडविटांच्या रंगभूमीवर बांधली. मूळ ‘शिखाबंधन’ या नावाने लिहिलेलं हे नाटक त्यातील चाणक्याच्या मुक्त शिखेप्रमाणे सतत दोन वर्षं लोंबकळत होते. कधी लेखकाच्या घरी, तर कधी निर्मात्याच्या दप्तरी. ते प्रथम रंगभूमीवर आणलं सावंतवाडीच्या ‘नाट्यदर्शन’ संस्थेने. त्यानंतर कोल्हापूरच्या ‘ट्रू फ्रेंड्स थिएटर’ने आणि त्यानंतर मुंबईच्या ‘आविष्कार’ या नामवंत प्रायोगिक नाट्यसंस्थेने त्यांचं हे नाटक सादर केलं. मुंबईकरांना त्यांच्या नाटकांचा प्रथम परिचय करून दिला तो त्यांच्या ‘आर्यचाणक्य’ या आविष्कार निर्मित नाटकाने. या नाटकाचं दिग्दर्शन आणि त्यातील प्रमुख भूमिका प्रमोद पवार यांनी केली होती. ‘आर्यचाणक्य’चे प्रयोग महाराष्ट्रात सर्वदूर झाले. पाचशेहून अधिक प्रयोगांचा पल्ला या नाटकाने गाठला. अर्थात त्याआधी आणि त्यानंतरही ‘लमों’ची नाटककार म्हणून ठसठशीत मुद्रा उमटलेली होतीच.
‘लमों’ना मिळालेले पुरस्कार
‘लमों’ना सर्वोत्कृष्ट हौशी नाटककार नाट्यदर्पण मानचिन्ह पुरस्कार १९८६ साली मिळाला. महाराष्ट्र शासनाचा मराठीतील वाङ्मय निर्मिती पुरस्कार ८७-८८ला मिळाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमार्फत ‘आचार्य अत्रे गुणगौरव पुरस्कार’ २००२मध्ये मिळाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ त्यांना १४ जून २०१४ रोजी मिळाला.

लमो हे नाटककार म्हणून कोकणात गाजले, तरी आपले करिअर घडवायला त्यांनी मुंबईची वाट कधीच धरली नाही. भिडस्त स्वभाव आणि कोकणातील वास्तव्य यामुळे ‘लमों’च्या प्रतिभेचे म्हणावे तसे चीज झाले नाही. कारण हा गावरान माणूस होता. कोकणच्या मातीची त्यांना ओढ होती. त्यामुळे ‘गड्या आपुला गाव बरा!’ या न्यायानं ते आपल्या मातीतच रमले.
अशा या दक्षिण कोकणातील सुंदरवाडीतील लक्ष्मण मोतीराम बांदेकर म्हणजेच कोकणच्या छोट्या गडकरींनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी जगाच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेतली.
– सुजाता सुनील टिकले
(कणकवली तालुक्यातील ‘ओटव नंबर एक’ या शाळेत पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत; लेखिका)
पत्ता : स्वानंद निवास, मु. पो. कलमठ, गोसावीवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०२
मोबाइल : ९४२२६३२६५२
ई-मेल : sujatatikale@gmail.com
…..
सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)