‘कानसेन’ ग्रुपचे पाचवे स्नेहसंमेलन सोशल मीडियाद्वारे सुरू; दहा दिवसांचे भरगच्च कार्यक्रम

रत्नागिरी : ‘कानसेन’ हा संगीतप्रेमींचा ग्रुप तयार झाला आणि बघता बघता पाच वर्षे पूर्ण झाली. गेली चार वर्षे यजमान रत्नागिरीकरांच्या पाहुणचारात हे संमेलन लाइव्ह स्वरूपात पार पडले; मात्र या वर्षी करोनाचे सावट असल्यामुळे सोशल मीडियाद्वारे सारे जण एकत्र आले आणि संमेलनाला अधिकच व्यापक स्वरूप प्राप्त झाले. फेसबुकच्या माध्यमातून तीन ऑक्टोबर २०२०पासून संमेलनाला सुरुवात झाली. १२ तारखेपर्यंत ते सुरू राहणार असून, यामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

दर वर्षी राज्यभरातून सुमारे ५०-६० जण रत्नागिरीत एकत्र यायचे. यंदा करोना आणि लॉकडाउनमुळे एकत्र येणे शक्य नाही. यावर अॅूडमिन सौ. सुनीता गाडगीळ यांनी सोशल मीडियाद्वारे संमेलनाचा प्रस्ताव सर्वांसमोर मांडला आणि यामध्ये ४८०हून अधिक जण सहभागी झाले आहेत. फेसबुकद्वारे सारे एकत्र आले असून, यामध्ये लाइव्ह सादरीकरणाबरोबरच काही जुन्या आठवणींनाही उजाळा मिळणार आहे. दिवसभर या ग्रुपवर विविध व्हिडिओ अपलोड होणार असून, रात्री नऊ वाजता दररोज तासभराचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे.

काल (ता. ३) रांगोळ्या, गणेशवंदना नृत्य, गायन, ईशस्तवन, मंगलाचरण, भक्तिगीते यांचे सादरीकरण झाले. आज शास्त्रीय-उपशास्त्रीय गायन, नाट्यगीते, ५ ऑक्टोबरला विविध प्रकारचे गीतगायन, ता. ६ रोजी सर्व सभासदांची एकमेकांशी ओळख केली जाणार आहे. यामध्ये एकमेकांशी चर्चाही रंगणार आहे. ता. ७ रोजी संगीताव्यतिरिक्त विविध कलांचे सादरीकरण, चित्रे, रांगोळी, फोटोग्राफी, मूर्तिकला, ओरिगामी, पॉटरी, मेंदी प्रात्यक्षिक, पाककला, विविध हस्तकला यांच्या ध्वनिचित्रफिती सादर होतील. ता. ८ रोजी लहान मुलांचे कार्यक्रम, यामध्ये कथाकथन, नाट्य, एकांकिका, जादूचे प्रयोग यांचा समावेश असेल. ता. ९ रोजी विविध गुणदर्शन, यामध्ये काव्यवाचन, कथा, काव्यगायन, अभिवाचन, नाट्यप्रवेश, मिमिक्री, मनोरंजनाचे कार्यक्रम यांची रेलचेल असेल. ता. १० रोजी एकल वाद्यवादन, वाद्य जुगलबंदी, शब्दाविना तालासुरांची गट्टी, विशिष्ट थीमवरील गीतगायन होईल. ता. ११ रोजी हिंदी चित्रपटगीते, गझल, देशभक्तिपर गीते, करावके गीतगायन आदी सादर होईल.

१२ ऑक्टोबरला भरतनाट्यम्, कथ्थक, लोकनृत्य यांसह विविध नृत्यप्रकारांनी संमेलनाची सांगता होईल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply