दिवाळीनिमित्त दिव्यांगांच्या कलाविष्कारात लॉकडाउनमध्येही खंड नाही; ‘आविष्कार’च्या वस्तू विकत घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : गेले काही महिने करोना आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व शाळा बंद आहेत. या काळात सामान्य विद्यार्थ्यांच्याच शिक्षणाची अडचण झाली आहे, तिथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणींची कल्पनाच केलेली बरी; मात्र रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील श्यामराव भिडे कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मात्र या कठीण काळातही आपली परंपरा राखली आहे. दर वर्षी हे विद्यार्थी दिवाळीसाठी कलात्मक वस्तूंची निर्मिती करतात. संस्थेतर्फे या उत्पादनांची विक्री केली जाते. यंदाही या विद्यार्थ्यांनी परंपरा घरूनच काम करून राखली आहे. संस्थेची वेबसाइटही अद्ययावत करण्यात आली असून, तेथे या उत्पादनांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

श्यामराव भिडे कार्यशाळे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी सांगितले, की करोनामुळे सर्वसामान्य विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असले, तरी सर्वच दिव्यांग विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत. किंबहुना सर्वच दिव्यांगानां ऑनलाइन शिक्षण लागूदेखील होत नाही. म्हणूनच कार्यशाळेने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि प्रशिक्षण निरंतर चालू राहण्याकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे लहान-लहान भाग करून विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरी देण्याची व्यवस्था केली. वस्तूंची निर्मिती अचूक आणि सुबक होण्याच्या दृष्टीने कार्यशाळा व्यवस्थापक फोन, गृह भेटीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे त्या कृतीचा प्रत्यक्ष व्हिडिओ तयार करून पालकांद्वारे विद्यार्थ्यांना पोहोचविला जात आहे.

वस्तूंच्या निर्मितीकरिता लागणारा कच्चा माल पालकांना संस्थेमध्ये बोलावून किंवा काही प्रसंगी व्यवस्थापक विद्यार्थ्यांच्या घरी नेऊन देत आहेत. त्यापासून करावयाच्या वस्तूनिर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षणही दिले जात आहे. या लॉकडाउन काळामध्ये चालू असलेल्या उपक्रमांचे सर्वत्र स्वागत होत असून, पालक आणि विद्यार्थीदेखील यामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने सहभागी होताना दिसत आहेत, असे वायंगणकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून प्रति वर्षी विविध वस्तू तयार होत असतात. या वस्तूनिर्मितीकरिता त्यांना कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. या वर्षी यामध्ये खंड पडणार अशी शंका येत होती. परंतु या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, व्यवस्थापक, पालक आणि कार्यशाळा जोडलेले असतात आणि म्हणूनच दिवाळीकरिता विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून विविध वस्तूंची निर्मिती कमी प्रमाणात का होईना, पण करण्यात आली आहे, असे वायंगणकर म्हणाले.

सध्या श्री. श्यामराव भिडे कार्यशाळेमध्ये आकाश कंदील, रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या मेणबत्त्या-पणत्या, आयुर्वेदिक उटणे, उटणे वडी, लहान-लहान आकर्षक आकाशकंदील, ग्रीटिंग कार्ड, विविध प्रकारची फुले, प्रेझेंट पाकिटे, इत्यादी वस्तू विक्रीकरिता उपलब्ध आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या ऑर्डर कुरियरद्वारेपाठविल्या जात आहेत. प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या या वस्तू खरेदी करून आशेचा किरण अधिक तेजोमय करू या, असे आवाहन वायंगणकर यांनी केले आहे.

घटस्थापनेचे औचित्य साधून आविष्कार संस्थेची वेबसाइट अद्ययावत करण्यात आली. संस्थेमध्ये सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यावर दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांचीही माहिती तेथे आहे. http://aavishkar-ratnagiri.org/ या वेबसाइटला भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सीए बिपिन शहा यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply