रत्नागिरी नगर वाचनालयातर्फे वाचकांसाठी कथा ऐकण्याची मोफत सुविधा

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सातत्याने नवनवीन उपक्रम वाचक सभासदांसाठी आयोजित करत असते. करोनामुळे बंद असलेली वाचनालये नुकतीच पुन्हा सुरू झाली असून वाचकांसाठी वाचनालयाने कथा ऐकण्याची मोफत सुविधा देणारे अॅप मोफत उपलब्ध करून दिले आहे.

डिजिटल युगाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन वाचनालयाने ऑडिओ डिजिटल सुविधेच्या माध्यमातून वाचनप्रेमींसाठी स्टोरी टेलसोबत करार केला आहे. वाचकांसाठी एक महिना स्टोरी टेल ॲप मोफत उपलब्ध करून दिले आहे. या ॲपचा एक महिना मोफत लाभ घेता येणार आहे. त्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.storytel.audiobites&hl=en_IN या लिंकवरून स्टोरीटेल ॲप डाऊनलोड करून घेता येईल. त्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन अकाउंट तयार करून साइन इन करावे. त्यानंतर सेटिंग्जवर जाऊन रिडीम कोड निवडावा. तेथे ABRATNAGIRI30 हा कोड टाकावा. सब्स्क्रिप्शनसाठी क्लिक करावे. त्यानंतर ऑडिओ बाइट्समधील दोन हजाराहून अधिक मराठी, हिंदी आणि इंग्रजी कथांचा आनंद रसिकांना घेता येईल, असे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय

दरम्यान, वाचकांसाठी घरपोच पुस्तके उपलब्ध करून देण्याची योजनाही वाचनालयचाने वाचक प्रेरणा दिनापासून सुरू केल्याचे श्री. पटवर्धन यांनी सांगितले. करोनामुळे वाचनालये बंद होती. आता वाचनालये सुरू झाली असली, तर करोना पूर्ण नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना वाचनालयात येणे कठीण जाणार असल्याने तसेच वाचनालयाची नवीन योजना म्हणून वाचक सभासदांसाठी त्यांच्या मागणीनुसार महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून नवीन पुस्तक घरपोच देण्याची सुविधा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय राबवणार आहे. या योजनेसाठी दरमहा १०० रुपये शुल्क आकारले जाईल. सहा महिन्यांसाठी ५५० रुपये अनामत घेतली जाईल. वाचकांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे पुस्तकांची नोंद असलेले अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून घेऊन त्यामधून आपल्याला हवे असणारे पुस्तक निवडून त्याचा क्रमांक वाचनालयात दूरध्वनीद्वारे अथवा मोबाइलद्वारे नोंदवायचा आहे.

नोंदणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अगर सोयीनुसार ते पुस्तक वाचक सभासदाकडे पाठविण्यात येईल. जुने पुस्तक वाचकाने वाचनालयाच्या पुस्तक घेऊन आलेल्या प्रतिनिधीकडे जमा केल्यानंतर नवीन पुस्तक वाचकाला उपलब्ध करून दिले जाईल. सर्वसाधारणपणे महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून देण्याची ही सेवा दिली जाईल. अधिक वेळा अथवा कमी कालावधीत पुस्तक बदलून हवे असल्यास त्यासाठी त्या प्रमाणात शुल्क आकारले जाईल. फ्लॅट, अपार्टमेंट, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सभासद वाचकांना इमारतीखालील प्रवेशद्वाराजवळ वाचनालयाचा प्रतिनिधी पुस्तक आणून देईल. गृहनिर्माण संस्थांचे त्रयस्थ माणसाच्या प्रवेशासंबंधी असलेले नियम लक्षात घेऊन वाचनालयाचा प्रतिनिधी फ्लॅटपर्यंत न जाता इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पुस्तक घेऊन जाईल. तेथे जमा पुस्तकाची व नव्याने वितरित केलेल्या पुस्तकाची नोंद वाचनालयाचा प्रतिनिधी समक्ष करेल.

ज्या वाचकांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल, त्यांनी वाचनालयाच्या कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १२ या कालावधीत नोंद करणे आवश्यक आहे. वाचनालयाची सेवा अधिक वाचकाभिमुख करण्याचा हा प्रयत्न वाचकांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. प्रारंभी ही सुविधा रत्नागिरी शहर क्षेत्रापुरतीच मर्यादित राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply