दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी शाळेचे गुरुवर्य मा. न. जोशी स्कूल असे नामकरण

रत्नागिरी : फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी, शिक्षक, उपमुख्याध्यापक आणि निवृत्तीनंतरही गुरुवर्य एमएन तथा माधव नरहर जोशी यांनी शाळेसाठी आयुष्यभर योगदान केले. गुरुवर्य फाटक यांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी सुरू केलेले फाटक हायस्कूल शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे. आता संस्थेने भारतीय संस्कृतीच्या विचारावर आधारित इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली असून, गुरुवर्य जोशी या योग्य व्यक्तीचे नाव शाळेला दिल्याचा विशेष आनंद वाटतो, असे प्रतिपादन दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबा परुळेकर यांनी केले.

गुरुवर्य जोशी यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त आज (२७ ऑक्टोबर) शाळा नामकरणाचा छोटेखानी कार्यक्रम झाला. त्या वेळी अ‍ॅड. परुळेकर बोलत होते. करोनाविषयक नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरुवर्य जोशी यांनी संस्थेच्या घटनेची इत्थंभूत माहिती असल्याने इंग्रजी माध्यमाची शाळा कशी असावी, याबाबत आम्हाला मार्गदर्शन केले. सामाजिक संदेश ते वागणुकीतून देत होते. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनीही या इमारतीसाठी योगदान केल्याबद्दल परुळेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

चालता बोलता माहितीकोष असलेल्या गुरुवर्य मा. न. जोशी यांचे नाव शाळेला दिल्याने दी न्यू एज्युकेशन सोसायटीचा मान वाढला आहे. संस्थेने असेच उत्तमोत्तम कार्य करावे, असे प्रतिपादन गुरुवर्य जोशी यांचे नातेवाईक विनय केळकर यांनी केले.

दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे नामकरण करताना विनय केळकर. सोबत डावीकडून डॉ. व. दि. जोशी, अ‍ॅड. विनय आंबुलकर, अ‍ॅड. सुमिता भावे, अ‍ॅड. बाबा परुळेकर.

या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष अ‍ॅड. परुळेकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. सौ. सुमिता भावे, उपाध्यक्ष अ‍ॅड. विनय आंबुलकर, उपाध्यक्ष डॉ. व. दि. जोशी उपस्थित होते. विनय केळकर, नितीन लिमये, आर्किटेक्ट शिरीष घोरपडे, बांधकाम व्यावसायिक सौ. पूजा व प्रसाद वाघधरे, रवींद्र घडशी आदींचा प्रातिनिधिक सत्कार या वेळी करण्यात आले. गुरुवर्य जोशी हे आयुष्यभर फाटक हायस्कूल व संस्थेच्या हितासाठी कार्यरत राहिले, असे डॉ. जोशी यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली लिमये यांनी केले. शाळा स्थापनेपासूनचा आढावा व्यवस्थापक व्ही. व्ही. जोशी यांनी घेतला. माजी सचिव सौ. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी गुरुवर्य जोशी यांच्या आठवणी जाग्या केल्या. विदुला शेट्ये यांनी आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply