रत्नागिरी : इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील डोळ्यांच्या उपचाराविषयींची कमतरता दूर झाली आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी व्यक्त केले.
मुंबईतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या मालिकेतील पंधरावे नेत्ररुग्णालय दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरीत सुरू झाले. डॉ. कमलापूरकर यांनी आज (पाच नोव्हेंबर) रुग्णालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत रुग्णांना डोळ्यांवरील अधिक उपचारांसाठी मुंबई-पुणे, कोल्हापूरला जावे लागत होते. शालेय आरोग्य तपासणीमध्येही काही मुलांमध्ये अधिक दोष आढळले, तर त्यांनाही रत्नागिरी जिल्ह्यातील सुसज्ज आरोग्य सुविधांच्या अभावी मोठ्या शहरांमध्ये जाण्याचा सल्ला द्यावा लागत होता. मात्र इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमुळे ती उणीव दूर झाली आहे. रुग्णालयातील स्वच्छता आणि व्यवस्थापन अत्यंत वाखाणण्यासारखे आहे.
डोळ्यांची काळजी घेण्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी रुग्णालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दिली. डॉ. कमलापूरकर यांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे नेत्रतपासणी केली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांचीही मोफत तपासणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
इन्फिगो हॉस्पिटलमधील बाल नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप देशपांडे यांनी कमलापूरकर यांना रुग्णालयातील यंत्रणा तसेच अद्ययावत यंत्रसामग्रीविषयीची माहिती दिली.
(लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजाराविषयी आणि ते होऊ नयेत म्हणून कशी खबरदारी घ्यावी, याविषयी इन्फिगो हॉस्पिटलमधील बालनेत्ररोगतज्ज्ञ दीपक देशपांडे यांनी दिलेली माहिती पाहा सोबतच्या व्हिडिओमध्ये…)


