करोना आणि आयुर्वेदीय उपचार संहिता

योग दिवस संपूर्ण जगात लोकप्रिय झाल्यानंतर केंद्र सरकारने २०१६पासून दर वर्षी येणाऱ्या दीपावलीतील धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे यंदा आज (१३ नोव्हेंबर २०२०) हा दिवस साजरा होत आहे. भगवान धन्वंतरी हे आरोग्यशास्त्राचे आराध्य दैवत मानले जाते. आरोग्यसंवर्धन होण्यासाठी म्हणून धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. Ayurveda for COVID19 Pandemic अर्थात ‘करोनासाठी आयुर्वेद’ हे यंदाच्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे घोषवाक्य आहे. त्या निमित्ताने हा लेख…

आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेद ही उपचारपद्धती नसून, जीवन पद्धती आहे. आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहार-विहार व आचार इत्यादींचे वर्णन या शास्त्रात केले आहे. विश्वस्वास्थ्य आणि विश्वकल्याण या हेतूने प्राचीन ऋषीमुनींनी नि:स्वार्थपणे या शास्त्राचे जतन व संवर्धन केले आहे. हा भारतीयांचा अनमोल ठेवा आहे. ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम च’ अर्थात निरोगी व्यक्तीचे आरोग्य अबाधित ठेवणे आणि हे आरोग्य सांभाळताना रोग झालाच तर, त्यावर उपचार करणे हे आयुर्वेदाचे प्रयोजन हे आहे. यात आरोग्यसंपन्न जीवन जगण्याला प्राधान्य दिले आहे, तर रोगावरील उपचाराला दुय्यम स्थान दिले आहे.

सध्या करोनासारख्या संकटाने संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध व उपचार यांबाबत केंद्र शासन, राज्य शासन, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील जबाबदार अधिकाऱ्यांना आयुष उपचार पद्धतीचा वापर करण्याबाबत मार्गदर्शनाची व्यवस्था केली. त्यासाठी ‘टास्क फोर्स ऑफ आयुष फॉर कोविड-१९’ची स्थापना १३ मे २०२० च्या शासन निर्णयाद्वारे करण्यात आली. या टास्क फोर्समार्फत वेळोवेळी आयुष उपचारांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या. एकीकडे संसर्ग होऊ नये म्हणून वरील उपाययोजना करणे आणि संसर्ग झालाच तर करोनासदृश आजार होऊ नये म्हणून रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहील याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी म्हणून आयुर्वेदाने ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

दिनचर्या : दिनचर्या म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत करावयाच्या बाबी. यामध्ये सकाळी लवकर उठणे, दंतधावन, गंडूष, नस्य, प्राणायाम, योगासने, व्यायाम, अभ्यंगस्नान इत्यादr बाबी अंतर्भूत आहेत. भूक लागली तरच योग्य मात्रेत भोजन करणे, दुपारी न झोपणे, रात्रीचे जेवण लवकर घेणे, रात्री जागरण न करता लवकर झोपणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत.

ऋतुचर्या : यामध्ये ऋतूनुसार आपल्या दैनंदिन आहार-विहारात बदल करणे आवश्यक आहे. सध्या हिवाळा आहे यात गरम पाणी पिणे, उबदार कपडे घालणे, अभ्यंगस्नान करणे, तसेच चवनप्राश इत्यादी रसायन द्रव्याचे सेवन करणे आदींचा समावेश आहे.

जलपान : अर्थात पाणी पिणे. निरोगी व्यक्तीनेदेखील अल्प प्रमाणात पाणी प्यावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. अस्वस्थ अल्पशा असे वर्णन आयुर्वेदात आले आहे. तहान नसताना सकाळी उठल्यावर पाणी पिणे टाळावे. तहान लागलेली नसताना पाणी प्याल्यामुळे भूक मंदावते व श्वसनसंस्थेचे/पचनसंस्थेचे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.

गंडूष व नस्य : हळद किंवा त्रिफळा चूर्ण घालून पाणी गरम करून त्याने गुळण्या कराव्यात. तसेच तिळाचे तेल किंवा खोबऱ्याचे तेल एक चमचा तोंडामध्ये घ्यावे व ते आत फिरवावे व दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात. यालाच ‘गंडूष’ असे म्हणतात. सकाळ-संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तेल किंवा तुपाचे चार-चार थेंब सोडावेत. यालाच नस्य असे म्हणतात. यामुळे नाकातून व तोंडातून करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

उष्ण जल : ‘उष्णोदकोपचारि स्यात’ अर्थात गरम पाणी पिण्यासाठी वापरावे. हे पाणी गरम करताना त्यात सुंठ, तुळस, दालचिनी, मिरे, बडीशेप इत्यादी द्रव्ये टाकून ते पाणी उकळून कोमट करून प्यावे.

आहार : आहार नेहमी पचायला हलका, गरम असा असावा. भूक नसताना काहीही खाऊ नये. भूक कमी असेल, तर मुगाच्या डाळीचे सूप प्यावे. जेवणात हळद, जिरे, धणे, लसूण, मिरे इत्यादी मसाल्याच्या पदार्थाचा वापर करावा. गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, फ्रीजचे अति थंड पदार्थ घेणे टाळावे.

आर्द्रक : दररोज जेवणापूर्वी आल्याचा छोटासा तुकडा मीठ लावून चावून खावा. यामुळे भूक चांगली लागते.

दूध : दुधात सुंठ घालून ते उकळून घ्यावे व त्यात एक चमचा हळद पावडर घालावी आणि असे दूध रोज घ्यावे. ज्यांना सर्दी, पडसे किंवा श्वास-कफाचा त्रास आहे त्यांनी दूध न घेणे उत्तम!

च्यवनप्राश : रोज सकाळी दोन चमचे च्यवनप्राश दुधातून घ्यावा. हा घेतल्यानंतर जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत नाश्ता किंवा जेवण करू नये. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी हा चवनप्राश साखररहित (शुगर फ्री) घ्यावा.

अग्नी : बहुतेक सर्व आजार हे अग्नी मंद असल्यामुळे अर्थात भूक नसताना आहार सेवन केल्यामुळे होतात असे आयुर्वेदाने म्हटले आहे. बरेचदा आपण जेवणाची वेळ झाली म्हणून भूक नसताना नाश्ता किंवा जेवण करतो हे योग्य नाही. लॉकडाउनमुळे बरेच जण घरीच असल्याने वेगवेगळे पदार्थ करून (करमणूक म्हणून) खातात. त्यामुळे भूक मंदावते, अपचन होते. परिणामी करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते. म्हणून भूक नसताना कटाक्षाने काही खाऊ नये.

मानसिक स्वास्थ्य : हे उत्तम ठेवणे आवश्यक आहे. दररोज कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी भस्रिका, सूर्यनमस्कार, योगासने इत्यादी बाबी नियमित कराव्यात आणि नेहमी सकारात्मक विचार करावेत.

वरील सर्व बाबींचे पालन केले तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अशा प्रकारे सर्व बाबी करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आणि चुकून संसर्ग झालाच तरीदेखील चालू ठेवाव्यात. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयुर्वेदतज्ज्ञांच्या सल्ल्याने आयुर्वेद उपचार घ्यावेत. गुळवेलीचा काढा, संशमनी वटी, अडुळसा, ज्येष्ठमध, सुंठ व आयुष काढा इत्यादी औषधे आयुर्वेदीय वैद्याच्या सल्ल्याने घ्यावीत.

आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, भुकेला जपणे (अर्थात भूक नसताना काहीही काही न खाता अजीर्ण, अपचन होऊ न देणे) आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे या बाबी कटाक्षाने पाळण्याचा संकल्प आज आपण धन्वंतरी जयंतीच्या निमित्त करू या आणि करोनासोबत जगायला शिकू या. राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या व धन्वंतरी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

  • वैद्य व्यंकट पुरुषोत्तम धर्माधिकारी
    सहायक संचालक, आयुष, पुणे
    विभाग प्रमुख, आयुर्वेद कक्ष, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे
    ई-मेल : venket.dharmadhikari@gmail.com
    मोबाइल : ९४२१४७९५५०
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply