सावंतवाडी येथील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ प्रा. वै. मुरलीधर प्रभुदेसाई यांचा लेख…
…..
गेले सुमारे आठ-नऊ महिने आपण सतत ‘करोना’ महामारीच्या दडपणाखाली वावरत आहोत. या महामारीची तीव्रता आता कमी होत असली, तरी अद्याप तिचा पूर्ण बीमोड झालेला नाही. ‘आयुर्वेद’ आणि ‘योग’ या आपल्या अस्सल भारतीय चिकित्सा पद्धती सोडल्या, तर अन्य सर्व चिकित्सा पद्धतींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्या दृष्टीने यापुढील काळात भविष्यकाळातील संभाव्य महामारींचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने घ्याव्या लागणाऱ्या जबाबदारीबाबत काही सुचविण्याचा हा एक प्रयत्न.
आयुर्वेदाने व्याधींबाबत वर्णन करताना दोन प्रकारे वर्गीकरण केले आहे – शारीरीक आणि मानसिक. मनाने खंबीर नसणाऱ्या व्यक्ती साध्या-साध्या विकारांना सहज बळी पडतात. याउलट अत्यंत गंभीर व्याधी झालेल्या व्यक्ती मनाने खंबीर असतील तर त्या व्याधीच्या कचाट्यातून अलगद बाहेर येतात, हा कित्येक वैद्यांचा अनुभव आहे. त्यामुळे व्याधिग्रस्त व्यक्तींच्या शारीरिक तपासणीसोबत मानसिक भावांची तपासणीदेखील अत्यावश्यक ठरते.
आयुर्वेदाने ‘सत्त्व’ हा मनाचा गुण मानला असून, ‘रज’ आणि ‘तम’ हे मनाचे दोन दोष मानले आहेत. मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी मनामध्ये ‘सत्त्व’ या गुणाचे आधिक्य आवश्यक आहे. याउलट ‘रज’ आणि ‘तम’ या दोषांचे प्राबल्य वाढल्यास मनोविकृती निर्माण होतात.
या वेळच्या करोनाच्या महामारीच्या काळात एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे सर्व प्रसिद्धीमाध्यमांनी करोना या महामारीबद्दल सामान्य जनमानसात प्रचंड भीती निर्माण करण्याचे काम केले. त्यामुळे ‘एकदा करोना झाला की आपला मृत्यू नक्की’ असा गैरसमज अतिशय वेगाने पसरला. करोना झालेल्या बऱ्याच रुग्णांचे मृत्यू हे मुख्यत: मनाच्या भीतीमुळे झाल्याचे आता समोर येऊ लागले आहे. नाही तर करोना झालेले अनेक रुग्ण व्याधीमुक्त होऊच शकले नसते.
आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘पथ्य-पालन’ या संकल्पनेला विशेष स्थान नाही. परंतु या वेळी कोविड-१९च्या महामारीवर निश्चित परिणामकारक असे उपाय उपलब्ध होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर किमान प्रतिबंधक उपाय योजून या महामारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि नाक व तोंड यावर आच्छादन करणारे मास्क वापरणे, हस्तांदोलनाऐवजी ‘नमस्ते’ करणे, सोशल डिस्टन्सिंग (पुरेसे अंतर ठेवणे), बालक आणि वृद्ध यांनी घराबाहेर न पडणे इत्यादी प्रतिबंधक उपाय अनिवार्य करण्यात आले. त्यासोबत यावर प्रतिबंधक लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आयुर्वेदात ‘प्रतिबंधक लसी’ला पर्याय काय, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. वास्तविक आयुर्वेदात वर्णन केलेले दिनचर्या, ऋतुचर्या आणि सद्वर्तन हे सर्व स्वास्थ्यरक्षणाचे उपाय प्रतिबंधक उपचारात समाविष्ट होतात.
आयुर्वेदाची जी दोन प्रमुख उद्दिष्टे सांगितलेली आहेत, त्यात ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं’ म्हणजे ‘निरोगी व्यक्तीचे आरोग्यरक्षण’ या उद्दिष्टाला अग्रक्रम दिलेला आहे. ‘आतुरस्य विकार-प्रशमनं’ म्हणजे ‘रुग्ण व्यक्तीला व्याधीमुक्त करणे’ या उद्दिष्टाला दुसरा क्रमांक दिलेला आहे.
आयुर्वेदाचे म्हणणे असे आहे, की वैद्याची भेट घेण्यासाठी आजारी पडायची वाट पाहू नये. वैद्याकडे वेळीच जावे, आपली प्रकृती समजून घ्यावी. दिनचर्या, ऋतुचर्या, सद्वर्तन यांची सविस्तर माहिती घ्यावी, बदलत्या ऋतुनुसार आपला आहार-विहार कसा असावा याचे ज्ञान घ्यावे आणि त्यानुरूप आपले वर्तन ठेवावे, म्हणजे मोठ्या आणि गंभीर विकारांपासून आपले संरक्षण होते. काही वेळा आपल्या आरोग्यरक्षणासाठी आपल्या अत्यंत आवडीच्या खाण्याच्या पदार्थांचा त्याग करावा लागतो. तसे झाले तर आरोग्यरक्षणासाठी मनापासून तशी तयारी करणे आवश्यक आहे.
सामान्यत: कोणत्याही सजीवाची कोणत्याही बंधनात राहण्याची मानसिक तयारी नसते. ‘मानव’ तर सर्वांत बुद्धिमान सजीव, तो या नियमाला अपवाद कसा ठरेल? ‘आम्ही काहीही खाल्ले/प्यालो, कसेही वागलो, तरीही आम्हाला आजारपणा येता कामा नये. त्यासाठी काय ती लस/औषधे/गोळ्या द्या,’ असा सामान्यत: सर्व रुग्णांचा आग्रह असतो; पण ‘कुछ (अच्छा) पाने के लिए कुछ (बुरा) खोना पडता है’, या म्हणीप्रमाणे पथ्य-सेवन आणि अपथ्याचा त्याग हे आरोग्यरक्षणासाठी आवश्यक आहे.
आधुनिक वैद्यकविश्वात जे काही संशोधन झाले, त्यामध्ये असे स्पष्ट झाले आहे, की कोणत्याही जीवाणू/विषाणूचे शरीरात संक्रमण झाले असता सायटोकाइन (Cytokine) हा प्रथिन-समूह स्रवतो आणि येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी शरीराची प्रतिकारक्षमता उत्तेजित होते आणि शरीराची संरक्षण-प्रक्रिया त्या जीवाणू/विषाणूचा प्रतिकार करण्यास सज्ज होते. अशा प्रकारे कोणत्याही बाह्य रोगजंतूंच्या आक्रमणापासून शरीराचे संरक्षण होते; पण रुग्ण व्यक्ती मनाने खंबीर नसेल, मनाने कमकुवत असेल, तर मनाच्या या कमजोर अवस्थेचा फायदा घेऊन मनात निर्माण झालेल्या भीतीमुळे ‘सायटोकाइन स्टॉर्म’ निर्माण होते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती अनियंत्रित होते आणि शरीराच्या निरोगी पेशींवरदेखील हल्ला चढविते. त्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती क्षीण होऊन रुग्ण मृत्यू पावतो.
या वेळी करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या बहुसंख्य रुग्णांमध्ये वरीलप्रमाणे ‘सायटोकाइन स्टॉर्म’ निर्माण होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे आणि सतत भीतीदायक वातावरणनिर्मिती करणाऱ्या वृत्तांचा भडिमार करून विविध प्रसारमाध्यमांनी त्याला चांगलाच हातभार लावला आहे. ‘मन’ या अदृश्य द्रव्याचे अस्तित्व मान्य करण्यासाठी आधुनिक विज्ञानाला विसाव्या शतकाची अखेर उजाडावी लागली, त्याच्या अस्तित्वाचे सविस्तर वर्णन आयुर्वेदाने सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीच केलेले आहे. तसेच सुखासाध्य (नक्की बऱ्या होणाऱ्या) व्याधींचे वर्णन करताना रुग्ण ‘सत्त्ववान’ (मानसिकदृष्ट्या खंबीर) असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केलेले आहे. मनाच्या स्वास्थ्यासाठी ‘सद्वृत्त-पालन’ हा स्वतंत्र विचार आयुर्वेदाने मांडला आहे आणि हा विचार मानवाच्या सध्याच्या ‘धन-लोभी’ आणि ‘बेबंद’ मनोवृत्तीमुळे अधोरेखित होत आहे.
मानवाला त्यासाठी आपल्या मनोवृत्तीत बरेच बदल करणे आवश्यक आहे. निसर्गाला आपल्या ‘तथाकथित विकासा’चे साधन मानून त्यावर विजय मिळविण्याच्या मानवाच्या सध्याच्या मनोवृत्तीचा त्याग करून त्याच्याशी मित्रत्वाचे नाते जोडणे आवश्यक आहे. तसेच त्यासोबतचा आपला रहिवास कसा सुखकर होईल, या दृष्टीने सर्व विश्वात जागृती निर्माण करणे सद्य:स्थितीत अत्यावश्यक आहे. ‘अर्थ’ (पैसा किंवा धन) हे आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट नाही. मानव-जन्माचे अंतिम ध्येय हे ‘मोक्ष’ असून, ‘पैसा’ हे ‘मोक्ष-प्राप्ती’चे एक साधन आहे, याबाबतची जागृती सर्व विश्वभर करणे ही आज काळाची गरज आहे.
कोविड-१९च्या या महामारीवर हमखास प्रभावी असा उपाय उपलब्ध नसल्याने शरीराची ‘रोगप्रतिबंधक वाढविणे’ या अत्यावश्यक बाबीकडे आता संशोधनाची दिशा वळू लागली आहे. त्यासाठी बऱ्याच औषध कंपन्यांनी वेगवेगळ्या औषधींचे मिश्रण करून बरीच औषधे बाजारात आणली आहेत. आपले आरोग्य केवळ डॉक्टरांच्या वा रुग्णालयांच्या हाती सोपवण्याची मानसिकता बनलेल्या जनतेने, करोनाच्या भीतीमुळे अव्वाच्या सव्वा किंमत मोजून, एक वा अनेक औषधी स्वत:च्या मनाने खाण्याचा सपाटा लावला आहे. परंतु केवळ विशिष्ट औषधे खाऊन ‘प्रतिकारशक्ती’ वाढवणे केवळ अशक्य आहे. तज्ज्ञ वैद्याकडून स्वत:ची प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार स्वत:चा ‘आहार’ आणि ‘विहार’ नक्की करणे, पर्यावरणाच्या बदलत्या ऋतुमानानुसार त्यात इष्ट ते बदल समजून घेणे (ऋतुचर्या), त्यासाठी आवश्यक ती बंधने स्वत:च्या आहार-विहारात घालून घेणे, तसेच मनाच्या आरोग्यासाठी आयुर्वेदाने आखून दिलेल्या सद्वर्तनाचे अनुशीलन करणे हे सर्व जमले, तरच व्याधिक्षमता (रोगप्रतिकारक क्षमता) वाढविणे शक्य आहे. औषधांचा उपयोग फक्त दिनचर्या, ऋतुचर्या आणि सद्वर्तन यांना ‘पूरक’ असा होऊ शकतो, या वस्तुस्थितीकडे सध्या पूर्ण डोळेझाक करण्यात आलेली आहे.

‘प्रतिकारक्षमता’ म्हणजे काय, ते आता पाहू. कोणत्याही शारीरिक, मानसिक, सामाजिक, पर्यावरणीय, परिस्थितीजन्य प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता म्हणजे ‘प्रतिकारक्षमता.’ मानवाच्या प्रतिकारक्षमतेचा विकास त्याच्या जन्मापासून सुरू होतो. मातेच्या उदरातून बाहेर पडण्याची प्रक्रिया हा प्रतिकारक्षमता विकसित होण्याचा पहिला टप्पा असतो; पण सध्या ‘त्या’ विकासाच्या ह्याच टप्प्यावर अडथळा निर्माण होत आहे. ‘नैसर्गिक प्रसूती’ ही सध्या भूतकाळात जमा होत आहे. ‘सिझेरियन-प्रसूती’ हीच दिवसेंदिवस ‘नैसर्गिक’ बनत आहे. (याची असंख्य कारणे आहेत आणि हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे; पण) यामुळे प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याच्या पहिल्याच प्रयत्नावर आघात होत आहे. त्यानंतर त्या बालकाचे संगोपन करताना निसर्गाशी समरस होण्याच्या अनेक संधींना चुकविले जाते. ‘उन्हात जाऊ नको’, ‘पावसात भिजू नको’, ‘पाण्यात डुंबू नको’, ‘धावू नको’, धुळीत खेळू नको’, ‘पडू नको, लागेल, जखम होईल’ इत्यादी अनेक ‘न’कार पचवीत आणि ‘पडे, झडे, वाढे’ या पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या उक्तीला मूठमाती देत त्या बालकाचा अनैसर्गिक ‘विकास’ होत जातो. (करोनाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्ट्यांत झालेल्या सर्वेक्षणात, घनदाट वस्ती असूनही कोविड-१९च्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय कमी आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून निसर्गाशी समरस होण्याचे महत्त्व स्पष्ट होते.)
तसेच, निसर्ग हा आपला नोकर नसून चांगला मित्र आहे, त्यामुळे त्याच्याशी जुळते घेत घेत आपला विकास साधणे आवश्यक आहे; ही सत्य स्थिती सर्वांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. आम्ही निसर्गावर आक्रमण करू (समुद्र हटवून त्यात बांधकाम करू, मौल्यवान खनिजे, इंधन-तेल आणि भूगर्भातील पाणी मिळविण्यासाठी भूगर्भाचे अनियंत्रित खोदकाम करू); पण ते सर्व निसर्गाने मुकाट्याने स्वीकारले पाहिजे, आम्हाला धूळ लागू नये म्हणून रस्ते आणि घराचा परिसर सिमेंट आणि डांबराने बनवू, निवासासाठी अनियंत्रित जंगलतोड करू, जंगले जाळून टाकू, प्रचंड बंधारे बांधून भूगर्भावरचा ताण (अनैसर्गिकरीत्या) वाढवू, हे सर्व हट्ट सोडून मानवाने निसर्गाला मित्रत्वाच्या नात्याने वागविले पाहिजे.
विविध प्रदूषणांमध्ये ‘हवेचे प्रदूषण’ हे विशेष लक्षणीय आहे. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी आखून दिलेल्या ‘यज्ञ-संस्थे’चे पुनरुज्जीवन आवश्यक वाटते. सर्व देशभर वेगवेगळ्या यज्ञांचे आयोजन केले गेले, तर स्वास्थ्यरक्षणासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी ‘अग्निहोत्र’ या साध्या, परंतु अत्यंत उपयुक्त उपायाला सर्व स्तरांवरून उत्तेजन देणे हितकारक ठरेल. प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी या दोन्ही उपायांचा चांगलाच हातभार लागणार आहे.
सांगण्याचा उद्देश एवढाच, की प्रतिकारक्षमता ही केवळ औषधांनी वाढणार नाही. त्यासाठी या सर्व उपायांचा अवलंब करणे अनिवार्य आहे.
तो भगवान धन्वंतरी सर्व संबंधितांना योग्य सद्बुद्धी देवो, हीच विनम्र प्रार्थना…. कारण
‘सर्वे अत्र सुखिन: संतु, सर्वे संतु निरामया:।।’
- प्रा. वै. मुरलीधर प्रभुदेसाई, कोलगाव, सावंतवाडी
मोबाइल : ९४२२४ ३५३२३
ई-मेल : vdmurali13@gmail.com

