भाजपतर्फे रत्नागिरीत वाढीव वीजबिलांविरोधात आंदोलन; राज्य सरकारचा धिक्कार

रत्नागिरी : लॉकडाउन काळातील वाढीव वीजबिले माफ करण्याच्या मागणीसाठी आज (२३ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षातर्फे रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथील महावितरण कार्यालयाबाहेर वीजबिले फाडून आंदोलन करण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडी शासनाचा धिक्कार करून, ‘रद्द करा, रद्द करा वाढीव वीजबिले रद्द करा, वीज बिले माफ करा, नाही तर खुर्च्या खाली करा, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, भारत माता की जय, वंदे मातरम,’ अशा घोषणा या वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, राजेश सावंत, राजू भाटलेकर, सचिन वहाळकर, भैय्या मलुष्टे, उमेश कुळकर्णी, अनिकेत पटवर्धन, संदीप शिंदे, राजन फाळके, ऐश्‍वर्या जठार, दामोदर लोकरे, राजीव कीर, बिपीन शिवलकर, राजश्री शिवलकर, प्राजक्ता रुमडे, राजेंद्र पटवर्धन व सुमारे १००हून अधिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.

‘शासन वीजबिलमाफी करत नाही तोपर्यंत बिलांसाठी कर्मचारी पाठवू नये,’ अशा तीव्र भावना भाजप नेत्यांनी महावितरणचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्याकडे व्यक्त केल्या. तसेच सायनेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ‘आपल्या भावना शासनाकडे पोहोचवतो,’ अशी ग्वाही त्यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिली. कोणाचीही वीज तोडण्यात आलेली नाही, असे सायनेकर यांनी स्पष्ट केले. लोकांनी भरलेल्या बिलामध्ये शासनाच्या आदेशानुसार सवलत मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply