रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे पाच टक्के दिव्यांग आहेत. त्यातील काहींना परिस्थितीमुळे दोन वेळचे अन्नही खायला मिळत नाही. काहींना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही. त्यांच्याकरिता आस्था सोशल फाउंडेशन ‘सन्मानाने अन्न’ ही नावीन्यपूर्ण योजना राबविणार येणार आहे. येत्या एक जानेवारीपासून हा उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी देणगीदारांनी पुढे यावे, अशी हाक फाउंडेशनच्या संस्थापक सौ. सुरेखा जोशी-पाथरे यांनी दिली आहे.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आस्थाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सौ. पाथरे म्हणाल्या, कोणत्याही दिव्यांग व्यक्तीवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये. लाचारीने भीक मागून जगण्याची हतबलता त्यांच्या नशिबी येऊ नये, यासाठी हा उपक्रम सुरू करत आहोत. संबंधितांनी संस्थेशी संपर्क साधल्यानंतर सत्यता, वास्तव परिस्थिती पडताळून अशा व्यक्तींच्या कायमस्वरूपी अन्नाची सोय होईपर्यंत अन्न पुरवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ज्या भावनेने देवाला नैवेद्य अर्पण करतो, त्याच भावनेने अन्नदानासाठी इच्छुक असणाऱ्या दात्यांनी संस्थेकडे संपर्क साधावा. देणगीदारांची रक्कम आयकराकरिता 80 जी कलमानुसार करसवलत मिळण्यास पात्र राहील. दात्यांचे दान सत्पात्री होईल, अशी ग्वाहीही सौ. पाथरे यांनी दिली.
अन्नदानासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शासन, देवस्थाने, मंडळे, ग्रामसंघ, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्तींशी संपर्क साधण्यात येणार आहे. त्यातून गरजू दिव्यांग व्यक्तीला अन्नपुरवठा केल्यानंतर अन्नाच्या बाबतीत ती व्यक्ती स्वयंपूर्ण झाली की मदत थांबवण्यात येणार आहे.
या उपक्रमाला रत्नागिरीसह बाहेरूनही हातभार लागेल, अशी अपेक्षा आस्था हेल्पलाइनचे समन्वयक संकेत चाळके यांनी व्यक्त केली. अधिक माहितीसाठी आस्था सोशल फाउंडेशन, संपर्क कार्यालय, छत्रपती शिवाजी क्रीडांगण, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. आस्था दिव्यांग हेल्पलाइनचा क्रमांक ९८३४४४०२०० असा असून त्यावर दिव्यांग आणि देणगीदारांनीही संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला शमिन शेरे, डॉ. श्रीष्टी भार्गव, संकेत साळवी, प्रथमेश पडवळ, प्रसाद आंबोळकर, श्रीमती संपदा कांबळे, श्रीमती स्नेहिका तांडेल, श्रीम. मयूरी जाधव, श्रीमती अनुष्का आग्रे आदी उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media