संशोधनात्मक दृष्टीने रामायणाचा अभ्यास आवश्यक : चंद्रशेखर वझे

रत्नागिरी : रामायणात करुणा, विरह आहे. आध्यात्मिक, धार्मिक विचार त्यात नंतर आणण्यात आला आहे. काही हास्यप्रचुरते घटनाही दाखवल्या गेल्या आहेत. अशा गोष्टी मूळ वाल्मीकी रामायणात नाहीत. त्यामुळे रामायणाचा अभ्यास, संशोधनात्मक दृष्टीने केला पाहिजे, असे आवाहन संस्कृत भारतीचे कोकण प्रांताध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी केले.

येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे आयोजित कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना अज्ञात रामायण या विषयावर ते बोलत होते. राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रास्ताविक केले.

श्री. वझे म्हणाले, वाल्मीकी रामायणामध्ये २४ हजार ३३५ श्लो क आहेत. वाल्मीकी हे ब्रह्मदेवाचे नातू. घडला तो इतिहास त्यांनी रामायणात मांडला आहे. श्री राम मानवी असल्याने त्याचा आदर्श घेतला पाहिजे. रामाचे श्रेष्ठत्व काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. राघवाची कथा कर्णमधुर आहे. राम हा मर्यादापुरुषोत्तम म्हणजे पुरुषाच्या उत्तमपणाची मर्यादा आहे. त्यापलीकडे कोणी नाही. तो गुणांचा परमोच्च बिंदू आहे. ते सांगताना काही बाबी त्यात नंतर आल्या आहेत. त्यावर संशोधन झाले पाहिजे. रामाचा आदर्श सांगण्यात आपण कमी पडतो. विद्यार्थ्यांनी इतरांवर अवलंबून न राहता स्वतः मूळ रामायण वाचून शहानिशा केली पाहिजे.

श्री. वझे म्हणाले, सत्त्वगुण आणि पराक्रमाचे प्रतीक आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. रामायणाचा अभ्यास आजच्या काळात महत्त्वाचा आहे. दुर्जनांचा नाश करण्यासाठी सज्जनांनी आपली शक्ती पणास लावली पाहिजे. सज्जनांच्या निष्क्रियतामुळे दुर्जनांवर विजय मिळवण्यासाठी रामाप्रमाणे पराक्रमाची गरज आहे. राजा कसा असावा हे सांगताना वझे म्हणाले, वनवासाला जाण्यापूर्वी प्रभु रामाने सर्व सेवकांचा १४ वर्षांचा पगार देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली. भरताने रामाच्या पावन पादुका ठेवून राज्यकारभार करताना खजिना दहापटीने वाढवला. हनुमानाने द्रोणागिरी आणला तरी तो पुन्हा होता तेथे नेऊन ठेवला. यातून पर्यावरणाचे महत्त्व दिसते. रावणवधानंतर जल्लोष करणार्यार सैनिकांनी लंकेत पर्यावरणीय हानी होऊ नये, असे आदेश भरताने दिले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थिनींनी संस्कृत गीतगायन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आशीष आठवले यांनी वझे यांचा परिचय करून दिला. जयंत अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.

रामाचे प्रशासन कसे होते, रामाचे राज्य यावे, असे का म्हणतात, कर्तव्यदक्ष राम, न्यायव्यवस्था, संरक्षण खाते, नोकरभरती, करसंग्रह अशा विविध स्वरूपातले रामाचे राज्य कसे होते, यावर उद्या (दि. १८ फेब्रुवारी) श्री. वझे व्याख्यान देणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply