आंबा प्रक्रिया उद्योजकाला मिळू शकतात ४० हजार रुपये

सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादकाला प्रक्रिया उद्योगासाठी किमान ४० हजार रुपये मिळू शकतील. त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेत केंद्राचा वाटा ६० टक्के आणि राज्यांचा वाटा ४० टक्के असेल. या योजनेसाठी देशभरात १० हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या योजनेमध्ये एक जिल्हा एक उत्पादन हे धोरण स्वीकारण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आंबा पिकाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांचा मूल्यसाखळी विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मदत होणार आहे.

योजनेअंतर्गत अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म उद्योगांचे आधुनिकीकरण करून त्यांना संघटित क्षेत्रामध्ये रूपांतरित करणे, शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट, सहकारी संस्थांना सार्वजनिक पायाभूत सुविधा, मूल्यवर्धन, फॉर्वर्ड बॅकवर्ड लिंकेज, ब्रॅंडिग आणि बाजारपेठ सुविधा याकरिता योजनेअंतर्गत पॅकेज उपलब्ध करून देणे हे उद्देश आहेत. जिल्ह्यातील कृषी अन्नप्रक्रियेशी संबंधित असलेल्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सामायिक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी क्रेडिट लिंकद्वारे बँक कर्जाशी संबंधित अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

पायाभूत सुविधा, मूल्यवर्धन, फॉर्वर्ड बॅकवर्ड लिंकेज, भाग भांडवल गुंतवणूक याकरिता प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के निधी, कमाल अनुदान १० लाख रुपयांच्या मर्यादेत आणि ब्रॅडिंग आणि बाजारपेठ सुविधेसाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान निधी क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सब्सिडी या आधारावर दिले जाणार आहे. लाभार्थी हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या १० टक्के रक्कम देणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती व महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार आहे. प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी विहित मापदंडानुसार होणारा संपूर्ण खर्च १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना खेळते भांडवल आणि छोटी अवजारे खरेदीसाठी अन्नप्रक्रिया उद्योगाशी संबंधित कमाल दहा सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणूक, भांडवल म्हणून फेडरेशनमार्फत प्रतिसदस्य कमाल ४० हजार रुपये दिले जातील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंबा उत्पादक आणि प्रक्रिया उद्योक करणाऱ्या वैयक्तिक लाभार्थ्यांनी https://mofpi.nic.in/pmfme/ आणि http://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता गट, सहकारी संस्थांनी ऑफलाइन पद्धतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply