खांबलवाडी ग्रामस्थांच्या पाणी योजनेला पहिल्याच दिवशी मिळाले पाणी

राजापूर : वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी पायपीट थांबविण्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता राजापूरजवळच्या धोपेश्वर गावातील खांबलवाडीच्या ग्रामस्थांनी श्रमदान आणि स्वखर्चातून खासगी नळपाणी योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी खोदलेल्या विहिरीला पहिल्याच दिवशी पाणी मिळाल्याने ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

खांबलवाडीतील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या भागासाठी शासकीय नळपाणी योजना असून वाडीमध्ये सार्वजनिक नळ असले, तरी तेथून महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागते. एप्रिल-मे महिन्यात या भागाला तीव्र पाणीटंचाई जाणवते. पाण्यासाठी होणारी ही परवड थांबविण्यासाठी खांबलवाडीतील ग्रामस्थांनी श्रमदान आणि स्वखर्चातून खासगी नळपाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विहीर खोदाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. भाजपाचे नेते दीपक बेंद्रे यांच्या हस्ते त्या कामाचा प्रारंभ झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष व राजापूर अर्बन बँकेचे संचालक हनिफ मुसा काझी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नाचणेकर, धोपेश्वर ग्रामपंचायत सदस्य सचिन खांबल, वाडीप्रमुख एकनाथ खांबल, सुभाष खांबल, विनोद खांबल, चिंतामणी खांबल, प्रकाश खांबल, पर्शुराम खडपे, सुनील कांबळी, प्रकाश कांबळी, रमेश मांजरेकर, राजू खांबल, केशव बापेडकर, भानू खांबल, रामचंद्र खांबल यांच्यासह वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

या विहिरीवरून नळजोडणी करण्यात येणार असून त्याद्वारे खांबलवाडीतील या नळपाणी योजनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांच्या घरोघरी पाणी पोहोचणार आहे. विहीर खोदायला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवशी विहिरीला पाणी लागले.

खांबलवाडी ग्रामस्थांच्या या नावीण्यपूर्ण आणि आदर्शवत कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply