अन्नपूर्णा प्रकल्पाने भूमीहीन शेतकऱ्यांचे सर्वार्थाने दिशान्तर : अनंत गीते

रत्नागिरी : शाश्वत उपजीविकेच्या अन्नपूर्णा प्रकल्पाने अल्पभूधारक, भूमीहीन शेतकऱ्यांच्या जीवनात सर्वार्थाने समृद्धीचे दिशान्तर झाले आहे. लोकांचे जीवनमान उंचावणारे असे प्रकल्प व्यापक स्तरावर कोकणात सर्वदूर व्हावेत. या प्रकल्पातून अर्थदुर्बलांना शाश्वत उपजीविकेचे स्रोत उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे महत्त्वाचे कार्य दिशान्तर संस्थेने केले आहे, असे उद्गार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी काढले.

वेहेळे-राजवीरवाडी (ता. चिपळूण) येथे सहकारातून सामुदायिक शेतीचा विषमुक्त शेतीचा अन्नपूर्णा प्रकल्प उभारण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत तेथील महिला शेतकऱ्यांनी लक्षावधींची उलाढाल करीत राज्य शासनाच्या पुरस्काराला गवसणी घातली. या प्रकल्पाला गीते यांनी अत्यंत आपुलकीने भेट दिली. यावेळी त्यांनी या बहुआयामी शेतीची पाहणी करून या वर्षातील कलिंगड तोडणीचा शुभारंभ केला.

प्रकल्पाच्या क्षेत्रात यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात श्री. गीते यांनी प्रकल्पाचे मुक्त कंठाने कौतुक केले. ते म्हणाले, करोनाने आपल्याला खूप काही शिकवले आहे. शहरांमधील नागरिकांनी गावाकडे जायला हवे, हा एक बोध होता तर दुसरीकडे या जागतिक महामारीत सगळेच घरकोंबडे झाले असताना जगाचा पोशिंदा शेतकरी हाच काम करीत होता. करोनाच्या काळात कंपन्या बंद पडल्या. सगळे व्यवहार ठप्प झाले. त्यात केवळ शेती आणि शेतकरी शाश्वत आहेत. अशा साऱ्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दशकांपासून माझ्या मनात शेतीविषयक जी आधुनिक पद्धती घोळत होती, तो स्वप्नवत शेती प्रकल्प प्रत्यक्षात साकारला गेला आहे, हे पाहण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामुळे महिला शेतकऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, असेही श्री. गीते म्हणाले. दिशान्तरने उभारलेल्या अन्नपूर्णाच्या आणखी दोन प्रकल्पांना लवकरच भेट देणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

दिशान्तर संस्थेने वस्ती विकास, ज्ञानयज्ञ, उडान, अन्नपूर्णा अशा लोककल्याणकारी प्रकल्पातून अर्थदुर्बल, वंचित, विद्यार्थी, शेतकरी यांच्या जीवनात सर्वार्थाने समृद्धीचे दिशान्तर घडविले आहे. शाश्वत उपजीविकेचा अन्नपूर्णा प्रकल्प कोकणातील कष्टकरी जनेतेचे प्रतिनिधित्त्व करतो आहे. असे प्रकल्प प्रत्येक तालुक्यात उभे राहायला हवेत, अशी अपेक्षा श्री. गीते यांनी व्यक्त केली.

श्री. गीते यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद सभापती विजय देसाई, सचिन आंब्रे, सुरेंद्र गोवळकर, नित्यानंद भागवत, निशांत जंगम होते. दिशान्तर संस्थेचे अध्यक्ष राजेश जोष्टे, सचिव सीमा यादव यांनी संस्थेची कामाची व विविध प्रकल्पांची माहिती दिली. प्रगती, भाग्यश्री व काळकाई या गटाच्या महिला यावेळी उपस्थित होत्या. शुभांगी राजवीर, सुलोचना राजवीर, प्रभावती भैरवकर यांनी दिशान्तर संस्थेच्या सहकार्यातून शेतीत साधलेल्या यशोगाथेची माहिती दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply