दिन साजरा करताना महिलांना मान दिला जातो का?

दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. काही समाजात आजही महिलांच्या बाबतीत ‘चूल आणि मूल’ हीच बुरसटलेली भावना दिसून येते. महिलांसाठी विशेष दिन साजरा केला जाताना त्यांना मान दिला जातो का, हा प्रश्न आहे.
……………..

एकीकडे महिला दिन साजरा करताना काही बाबींचा विचार करायलाच हवा. खरे पाहिले तर महिला या पुरुषाइतक्याच किंबहुना काही बाबतीत त्याहीपेक्षा अधिक कर्तृत्ववान असल्याचे अनेक बाबतीत सिद्ध झालेले दिसते. क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, इतकेच नव्हे तर भारतीय लष्करातही निरनिराळ्या जबाबदारीच्या जागांवर महिला कार्यरत असल्याचे दिसते. समाजकारण, राजकारणातही महिला पुरुषांबरोबर काम करताना दिसतात. पण हे यश मिळवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला.

महिलांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जे हाल सोसले, त्याची आता सर्वांनाच माहिती झाली आहे. त्याची पुनरावृत्ती करण्याचे कारण नाही. सध्या सुरू असलेल्या करोनाच्या साथीतही महिला डॉक्टर, परिचारिका, महिला पोलीस, आरोग्य खात्यातील महिलांचे कार्य उठून दिसते. या सर्वांना सलाम.

भारतीय लष्करात किंवा पोलिसात कर्तव्यावर असताना अनेक लष्करी अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांना शत्रूशी सामना करताना वीरमरण येते. अशा वेळी त्यांची पत्नी खचून न जाता त्याची जागा भरून काढते. खान्देशात काही गावात शाळेतील शिक्षिका, विधवा, विनाअपत्य एकटी राहणारी महिलांची जागेचे भाडे न घेताच राहण्याची सोय केली जाते. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते. माझ्या माहितीत धरणगाव येथे एका मारवाडी कुटुंबात पतीची हत्या झाली, तेव्हा त्या महिलेला तिच्या दोन लहान मुलींसह गावकऱ्यांनी गावातच विनामूल्य राहण्याची सोय केली. तेवढ्या आधारावर त्या महिलेले स्वयंपाकाची कामे करून आपल्या दोन मुलींना शाळेत घातले. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. स्वत: अशिक्षित असूनही मुलीना पदवीधर बनवले. त्यांचे संसार उभे करून दिले. महिलांच्या कर्तृत्वाची अशी अनेक उदाहरणे देता येतील.

आज महिला दिनाच्या निमित्ताने समाजाला भेडसावणारे काही प्रश्न सर्वांच्या नजरेत आणणेही गरजेचे आहे. कर्तृत्ववान पुरुषांना त्यांच्या कार्यात पत्नीची साथ मिळते. पण क्वचितप्रसंगी घरातील महिलाच आजारी पडते, तिला अपघात होतो किवा दुर्धर आजाराने ती पछाडली जाते. परावलंबी बनते. अशा वेळी अंगात गुण असूनही ती काही करू शकत नाही. तेव्हा तिचा घरातील कुटुंबाकडून तिरस्कार केला जातो. तिची सर्व कामे पतीलाच करावी लागतात. तिच्यामुळे पतीला अनेक कामांना मुरड घालावी लागते. मुलांकडेही पाहावे लागते. समाजाच्या टीकेला दोघांनाही सामोरे जावे लागते.

काही वेळेस स्त्रीला मूल होत नाही. अशावेळी पती-पत्नी या दोघांची तपासणी करणे, दोष कुणाचा आहे ते पाहणे महत्त्वाचे असते. जरूर पडल्यास वैद्यकीय सहाय्य घेण्याचीही गरज असते. पण हे सर्व न करता स्त्रीलाच दोषी ठरवले जाते. तिचा घरात छळ होतो. त्यातून हत्या, आत्महत्येसारख्या अमानुष घटना घडतात. हे सारे घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी थांबवले पाहिजे. तिच्याबद्दल नाराजी व्यक्त न होता तिला सहानुभूती दाखवली गेली पाहिजे. काही घटनांमध्ये पुरुष मंडळी पुन्हा बोहोल्यावर चढण्याच्या (दुसरे लग्न करण्याच्या) तयारीत दिसतात. हे सारे थांवले पाहिजे. अगदी सुशिक्षित कुटुंबातही व्यवसायाचे कारण देऊन पैशांची मागणी केली जाते. वाहन खरेदीसाठी मुलीच्या माहेरून पैसे आणण्यासाठी नववधूचा छळ केला जातो. याला स्त्रीस्वातंत्र्य म्हणायचे का? जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील या रूढ प्रथांचाही विचार झाला पाहिजे. घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी, सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेऊन हे सारे थांबवले पाहिजे. पीडित महिलांना सहानुभूतीची वागणूक दिली गेली, तर तिचे मानसिक स्वास्थ्य स्थिर राहू शकेल आणि खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केल्याचे समाधान सर्वांनाच लाभू शकेल.

  • विनायक बेटावदकर, कल्याण
    (संपर्क : ९६१९१४८२६०)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply