रत्नागिरी : इन्फिगो ग्रुपच्या नेत्र रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना करोनाविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रियाही सुरक्षेची काळजी घेऊन केल्या जातात. त्यामुळे रुग्णांनी करोनाला घाबरू नये, असे आवाहन इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.
ते म्हणाले, इन्फिगो ग्रुपच्या राज्यभरातील १७ रुग्णालयांमधील ६०० हून अधिक कर्मचार्यां ना करोनाविषयक काळजी घेण्याचे डिजिटल पुस्तक दिले. ऑनलाइन मार्गदर्शनही केले. त्यावर आधारित ऑनलाइन परीक्षाही घेतली. करोनाशी लढा देताना रुग्णालय कर्मचार्यां्ची जबाबदारी महत्त्वाची असल्याने त्यांच्यात जाणीवजागृती व्हावी, याकरिता ही परीक्षा घेतली. नव्वद टक्के गुण मिळवणारे उत्तीर्ण झाले. त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले. इतर रुग्णालयांमध्ये असे प्रशिक्षण आणि परीक्षा घेण्याकरिता सहकार्य करण्याची तयारीही डॉ. ठाकूर यांनी दर्शवली आहे.
गेल्या वर्षी करोना आणि लॉकडाउनचे संकट ओढवले. मात्र या कालावधीत सर्व ती काळजी घेत इन्फिगो आय केअरने हजारो रुग्णांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. आता जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या काळातही अधिक सुरक्षितपणे उपचार केले जाणार आहेत. त्याकरिता दररोज स्क्रीनिंग केले जाते. लहान मुलांना जास्त वेळ रुग्णालयात थांबावे लागू नये, यासाठी जलद यंत्रणा राबवली आहे. केवळ १५ मिनिटांत त्यांची तपासणी, समुपदेशन करून त्यांना घरी सोडले जाते, असेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले.
इन्फिगो आय केअरची राज्यभर १७ रुग्णालये आहेत. करोना काळात सर्व रुग्णालये सुरक्षितपणे कार्यरत आहेत. रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी, रुग्णवाहिकाचालकांना २ महिन्यांपूर्वीच लस दिली आहे. इन्फिगोमध्ये चष्म्याच्या दुकानातही चष्म्याची काळजी कशी घ्यावी, ते कसे हाताळावेत, याची पुरेशी माहिती दिली आहे, असे डॉ. ठाकूर म्हणाले.
लॉकडाउनच्या कालावधीत एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर रत्नागिरी शहर परिसरातील घरी जाण्यास वाहनाची व्यवस्था करण्याची ग्वाही डॉ. ठाकूर यांनी दिली. ते म्हणाले, भारत सरकारच्या एनएबीएच नियमांनुसार इन्फिगोमध्ये दर्जेदार ऑपरेशन थिएटर आहे. तेथे नेहमीच निर्जंतुकीकरण केले जाते. करोना कालावधीसाठी प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र सेट वापरला जातो. असे २० संच रत्नागिरीत उपलब्ध आहेत. लॉकडाउनच्या काळात ज्येष्ठ लोकांमध्ये भीती होती. त्यामुळे काहींचा मोतीबिंदू वाढत गेला. पिकलेला मोतिबिंदू कडक झाला. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या शस्त्रक्रियाही काही मिनिटांत केल्या जातात. अनेक गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया रत्नागिरीत करण्यात आल्या.
मधुमेही रुग्णांनी आपल्या डोळ्याच्या पडद्याची तपासणी करून घ्यावी. गुंतागुंत वाढवू नये दैनंदिन तपासणीच्या वेळा पुढे ढकलू नयेत. वेळेवर येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. ठाकूर यांनी केले आहे.

