लांजा : येथील गुरववाडी येथील सतीमाता आदर्श युवक मंडळाने वार्षिक पूजेऐवजी करोना युद्धात भरीव कामगिरी करणाऱ्या पोलिसांना भोजन देऊन वेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा केला.
सतीमाता आदर्श युवक मंडळ विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. समाजातील लोकांनी एकत्र यावे, या उद्देशाने दरवर्षी देवी सतीमाता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त वाडीत पूजा केली जाते. गेल्या वर्षी करोनाप्रतिबंधक संचारबंदीमुळे पूजा होऊ शकली नाही. यावर्षीही तीच स्थिती आल्याने पूजा होणार नाही, हे निश्चित झाले. त्यामुळे वेगळा उपक्रम राबविण्याचे मंडळाने ठरविले. करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लांजा तालुक्यातील पोलीस आपल्या जिवाची परवा न करता कडक बंदोबस्त ठेवत आहेत. ते दिवसरात्र राबत आहेत. त्यांच्यासाठी वाडीतील लहान मुलांतर्फे भोजनाचा कार्यक्रम आखण्यात आला. तो आज अमलात आला.
पूजेऐवजी भोजन देऊन वार्षिक उत्सव साजरा करण्याच्या या उपक्रमाबद्दल लांजा तालुक्यातील पोलिसांनी गुरववाडीतील लहान मुलांचे आणि मंडळाचे आभार मानले. मंडळातर्फे किरण गुरव, अभिषेक गुरव, दत्तप्रसाद घाग, विशाल कांबळे, संदेश गुरव या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला. करोनाप्रतिबंधाचे सारे नियम पाळून हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड