मधूऽऽऽऽ

रत्नागिरीतील ज्येष्ठ संवादिनीवादक मधुसूदन लेले यांचे ८ मे रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या सहकाऱ्याने त्यांच्या आठवणी जागवत त्यांना वाहिलेली श्रद्धांजली.
………

रात्रीचे १०.३० वाजले होते, मोबाइल बघत झोपायला जाणार. एवढ्यात फेसबुकवरील एका पोस्टने काळजात चर्रर्र झाले.. ती पोस्ट म्हणजे प्रमोद जोशींची कविता होती..
“प्रिय मधू लेले.. हे नाही पटत “

…कळलंच नाही काय होतंय ते.. पहिल्या दोन ओळी वाचल्या आणि लगेचच हेरंबला फोन केला… हेरंबच्या ‘बोल निबंध’ या दोन शब्दांच्या टोनवरूनच समजंल की आपण आत्ता वाचलं ते खरं आहे. लेले सर गेले..

आजपर्यंत लेले सरांनी मला आणि मी त्यांना कधी ये-जा केलं नाही, मी त्यांना लेले सर म्हणायचो, ते मला कानिटकर सर म्हणायचे… जरी लेले सर माझ्यापेक्षा वयाने ८-९ वर्षांनी लहान होते. तरीही… पण आज मी अरे म्हणणार आहे… शेवटी ऐकू येऊ नये, अशी बातमी ऐकायला लागली..मधू गेला…

तशी मधूची आणि माझी ओळख काही फार जुनी नाही, अवघी १२-१४ वर्षांतली असेल… गाण्याच्या कार्यक्रमात बैठक व्यवस्थेच्या प्रथेप्रमाणे संवादिनी वादक आणि निवेदक एकमेकांच्या आजूबाजूला, त्यामुळे या १२-१४ वर्षांत अनेकवेळा मधूच्या बाजूला बसत होतो, निवेदन अतिशय लक्षपूर्वक ऐकून उत्तम दाद देण्यात त्याचा हातखंडा होता. “कानिटकर सर, तुम्ही खूप नेमकं आणि आवश्यक बोलता, आम्हाला निवेदन कधी संपणार आणि गाणं कधी सुरू होणार हे बरोबर कळतं तुमच्या बोलण्यावरून”, ही त्याची नेहमीची प्रतिक्रिया..

खरं म्हणजे रसायनशास्त्राचा प्राध्यापक असलेला हा माणूस कलेच्या क्षेत्रात इतक्या लीलया वावरला की कोणाला सांगून खरंसुद्धा वाटणार नाही की हा रसायनशास्त्रासारखा किचकट विषय शिकवत असेल! पण त्याच्या त्या पेशापेक्षा त्याची केमिस्ट्री संवादिनीशी अधिक घट्ट जुळली.

एकदा गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मी आणि मधू एकत्र होतो, तेव्हा त्याचं लग्न व्हायचं होतं, त्या कार्यक्रमात बोलताना मी पुढच्या वर्षीपर्यंत याचे दोनाचे चार हात होऊ देत, अशी प्रार्थना केली आणि खरंच त्या वर्षात त्याचं लग्न झालं. ही त्याच्याविषयी माझ्या मनात एक चांगली आठवण होती.

त्यानंतर अनेक कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो, तेव्हा त्याचा हळूहळू परिचय वाढत गेला. खूप विषयांवर गप्पा व्हायच्या.

आत्ताच गेल्या महिन्यात आमच्या कलांगणच्या कार्यक्रमासाठी मी त्याला बोलावलं होतं. पण आदल्या दिवशी मला फोन करून म्हणाला की, “मी vaccine घेतलंय. त्यामुळे मी येऊ शकणार नाही. माझ्याऐवजी मी चैतन्यला पाठवतो.” …त्यादिवशी कुठे माहीत होतं, आज बोलतोय हे आपलं शेवटचं संभाषण असेल असं

आणि अचानक काल (८ मे) रात्री ही बातमी आली!

अरे मधू, केवळ ३८, हे काय जाण्याचं वय होतं का रे तुझं? काही सुचत नाही. म्हणजे काय होत असेल ही अवस्था मी काल अनुभवली. अनेकांचे मेसेज येत होते. त्यांना मी पण अत्यंत यांत्रिकपणे रिप्लाय देत होतो, पण कळतंच नव्हतं, नक्की काय चाललंय ते… संवेदना गोठल्यासारख्या झाल्या होत्या. रात्री झोपल्यावरसुद्धा सतत डोळ्यांसमोर मधूच दिसत होता… पण आता तो खरा कधीच दिसणार नव्हता… मला आता कधीच स्टेजवर त्याच्या शेजारी बसता येणार नव्हतं… हे कळत होतं पण वळत नव्हतं.

एकदा राजापूरला कार्यक्रम होता, कार्यक्रम संपल्यावर खूप भूक लागली होती. त्या संस्थेच्या शिपायाला मी म्हटलं, अरे, ते मघाशी वेफर्स देत होतास ते संपले काय रे? त्याने लगेच अख्खी पिशवीच आणून दिली. मी मधूला म्हटलं.. “लेले सर, या वेफर्स खाऊ या.” त्या दिवशीचा मधूचा चेहरा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे, त्यालाही भूक लागलीच होती, तो इतका निरागस खूष झाला होता… मला म्हणाला, “कानिटकर सर, केवढं मोठं काम केलंत तुम्ही, कसं सांगू तुम्हाला, मला खरंच हवंच होतं काहीतरी खायला, मी ना याबद्दल तुमच्याकडे दोन कार्यक्रम असेच वाजवीन.. बिदागी न घेता…”
अरे, आता कसे कार्यक्रम वाजवणार तू? हा, स्वर्गातसुद्धा तू नक्की मैफिल जमवशील. कारण तू कलेचा भोक्ता आहेस.. अरे, इथे होतास असं लिहायला हवं होतं नाही का? पण मधू लेले होता, असे शब्द लिहिले जातच नाहीत. त्याला काय करणार…

हरवले मधू तुझ्या संवादिनीचे सूर…

  • निबंध कानिटकर
    (संपर्क – ९४२२३७६३२७)

…………………………………………

रत्नागिरीच्या संगीत क्षेत्रावर मोठा आघात

प्रख्यात हार्मोनियम, ऑर्गनवादक मधुसूदन लेले यांचे अल्पशा आजाराने काल (८ मे) रात्री गोळप (ता. रत्नागिरी) येथे राहत्या घरी निधन झाले. महिन्याभरापूर्वी तबलावादक मिलिंद टिकेकर यांचे निधन आणि आता लेले यांचे निधन झाल्याने रत्नागिरीच्या संगीत क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. रत्नागिरीसह मुंबई, पुण्यातील कलाकारांनी लेले यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करून ही धक्कादायक बातमी आहे, असे संदेश येथील कलाकारांना पाठवले आहेत.

लेले यांनी २००२ साली रत्नागिरीच्या संगीत क्षेत्रात प्रवेश केला. अल्पावधीतच त्यांनी नाव कमावले. खल्वायनच्या मासिक संगीत मैफलींमध्ये २००८ पासून ते संगीतसाथ करायचे. लेले यांनी हार्मोनियमचे सुरवातीचे शिक्षण विजय रानडे, चंद्रशेखर गोंधळेकर यांच्याकडे घेतले. त्यानंतर त्यांनी प्रख्यात ऑर्गनवादक पं. तुळशीदास बोरकर यांचे शिष्यत्व स्वीकारले. नंतर त्यांचे ते पट्टशिष्य झाले. अगदी दोन वर्षांपूर्वी पं. बोरकर यांचे निधन होईपर्यंत लेले त्यांच्याकडे शिकायला जात होते.

लेले यांनी आतापर्यंत प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर, आनंद भाटे, विघ्नेश जोशी, मंजूषा कुलकर्णी-पाटील, जयतीर्थ मेवुंडी, विजय कोपरकर आदींच्या मैफलींमध्ये यांनी संवादिनी साथ केली होती. ‘कीर्तनसंध्या’मध्ये राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनाही साथ केली. ते अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते.

खल्वायन संस्थेच्या अनेक संगीत नाटकांमध्ये लेले यांनी ऑर्गनसाथ केली. संगीत राज्य नाट्य स्पर्धेत ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘संगीत ताजमहाल’ या नाटकांसाठी त्यांना वादनाचे बक्षीस मिळाले. लेले यांच्या पश्चा्त आई, वडील, पत्नी, मुलगी, बहीण, आत्या असा परिवार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply