मोफत रिक्षासेवेमुळे लसीकरण झाले सुसह्य

रत्नागिरी : सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. ऑनलाइन-ऑफलाइन नोंदणी आणि इतर अनेक कारणांमुळे लसीकरण कार्यक्रमाची मोठी चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा अधिक त्रास होत आहे. मात्र रत्नागिरीतील मोफत रिक्षाच्या उपक्रमामुळे अनेकांना लसीकरण सुसह्य झाले आहे.

करोना संक्रमण रोखायचे असेल तर तूर्त लस घेणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. लशींचा तुटवडा जाणवत असला तरी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अशा वेळी अनेकांच्या मदतीला नेहमीच धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी “लसीकरणासाठी मोफत रिक्षा” हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ही मोफत रिक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक, महिलांकडे वाहन नसते. त्यांच्यासाठी ही मोफत रिक्षाची व्यवस्था सौरभ मलुष्टे यांनी केली आहे.

सुरुवातीला रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते शिवाजीनगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे श्री. मलुष्टे यांनी जाहीर केले होते. मात्र आता ही मर्यादा त्यांनी काढून टाकली आहे. कारण लसीकरणाकरिता आपले नाव नेमके कोणत्या केंद्रावर येणार आहे, हे अनेक ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर गेल्याशिवाय समजत नाही. कोकण नगर केंद्रावर गेल्यानंतर आपले नाव पटवर्धन हायस्कूलच्या केंद्रावर आहे असे समजले की त्यांची तारांबळ होते. याशिवाय उपक्रम जाहीर झाल्यानंतर रत्नागिरी शहर आणि परिसरातील मिरजोळे, शिरगाव इत्यादी भागातूनही श्री. मलुष्टे ते यांना फोन येऊ लागले. त्यामुळे त्यांनी या सर्व भागात रिक्षा उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले आहे.

लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी रिक्षासारखे वाहन उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रिक्षा मोफत देऊ नका. तुम्हाला त्याचे भाडे देतो, असे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. पण श्री. मलुष्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. करोनाच्या आपत्तीच्या काळात समाजाला अल्पशा प्रमाणात का होईना, आपल्या मदतीचा हातभार लागावा, हाच आपला उद्देश असल्यामुळे लसीकरणाकरिता जाणाऱ्यांकडून भाडे घ्यायचे नाही, असे ठरविले आहे, असे श्री. मलुष्टे यांनी आवर्जून सांगितले. गेल्या दोन दिवसांत दीडशेपेक्षा अधिक लोकांना लसीकरण केंद्रावर नेऊन पुन्हा घरी सोडल्याची माहिती श्री मलुष्टे यांनी दिली.

श्री. मलुष्टे यांच्या या उपक्रमानंतर रत्नागिरी शहरातील बैलबाग परिसरातील जागुष्टे आणि चिपळूणमधील श्रीमती जोशी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि आपल्या भागात स्वतः उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. मदतीचे असे हात पुढे आले, तर रिक्षा हे करोनाच्या काळातील महत्त्वाचे साधन ठरेल, असा विश्वास श्री. मलुष्टे यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी शहर आणि परिसरातील लसीकरण केंद्रावर जाण्याकरिता मोफत रिक्षाच्या सेवेसाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी आदल्या दिवशी सौरभ मलुष्टे (७९७२१३०८५३), योगेश वीरकर (९५२७६२३६९६) किंवा सुनील बेंडखळे (९०२८४७८३४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply