तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात ४४७ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

सिंधुदुर्गनगरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिवसभरात ४४७ घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

तौते चक्रीवादळ आज सकाळी जिल्ह्याच्या समुद्रात दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वारे आणि पाऊस झाला. दुपारी हे वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रातून रत्नागिरी जिल्ह्याकडे सरकले. तत्पूर्वी रात्रीपासूनच जिल्ह्यात जोरदार पावसास सुरुवात झाली. जिल्ह्यात ताशी सुमारे ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या काळात जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या सर्व खबरदारीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जिल्ह्यात ३७ गोठ्यांचे नुकसान झाले, १४३ ठिकाणी झाडे पडली. ३ शाळा, १० शेडचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसान झालेल्या शेडमध्ये एका स्मशानशेडचाही समावेश आहे. त्याशिवाय १४ शासकीय इमारतींचे नुकसान झाले. महावितरण कंपनीचे २३ खांब पडले. दोन विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय नुकसानीची आकडेवारी अशी : वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तेथे १६० घरांचे नुकसान झाले. १५ गोठ्यांची, २ शाळांच्या नुकसानीची माहिती आहे. विजेचे ३ खांबही पडले आहेत. एक स्मशानभूमी शेड आणि एक शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात ९० घरांचे, १० गोठ्यांचे, एका शाळेचे, ४ शासकीय इमारतींचे, एका शेडचे नुकसान झाले आहे. तसेच विजेच्या ६ खांबांचेही नुकसान झाले आहे. ६ ठिकाणी झाडे कोसळली. सावंतवाडी तालुक्यात ५७ घरांचे, ३ गोठ्यांचे, २ शेडचे आणि २ विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. तसेच ५७ ठिकाणी झाडे पडली. कुडाळ तालुक्यात ४३ घरांचे, ३ गोठ्यांचे, ४ शेडचे आणि ३ शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. तालुक्यात १२ ठिकाणी विजेच्या खांबांचे नुकसान झाले आहे. ५३ ठिकाणी झाडे कोसळली. वेंगुर्ले तालुक्यात ४० घरांचे, २ गोठ्यांचे आणि ६ शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे, तर ५ ठिकाणी झाडे पडली आहेत. मालवण तालुक्यात ३४ घरांचे, एका गोठ्याचे, एका शेडचे नुकसान आणि ३ ठिकाणी झाडे पडली आहेत, तर एका विद्युत वाहिनीचे नुकसान झाले. देवगड तालुक्यात २२ घरांचे, ३ गोठ्यांचे आणि एका शासकीय इमारतीचे नुकसान झाले. एका विद्युत वाहिनीच्या नुकसानीबरोबरच ६ ठिकाणी झाडे पडली आहेत. दोडामार्ग तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे तर ८ ठिकाणी झाडे पडली.

जिल्ह्यात एकूण १४४ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. त्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील ३५, निवती मेढा येथील २३, देवगड तालुक्यातील आनंदवाडी-तारामुंबरी येथील ४४ व्यक्ती आणि देवगड येथील ७, तर मालवण तालुक्यातील देवबाग येथील ३५ व्यक्तींचा समावेश आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कोणतीही मच्छीमार बोट समुद्रात गेलेली नाही. सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.

ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ही माहिती जिल्हा आपत्ती व्यव्सथापन प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply