रत्नागिरीत चक्रीवादळाने साडेतीन लाख ग्राहक अजूनही विजेविना; जिल्ह्यात किमान एक हजार घरांचे नुकसान

रत्नागिरी : अरबी समुद्रात रविवारी, १६ मे रोजी झालेल्या तौते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सर्वाधिक नुकसान झाले असून त्यामुळे सुमारे साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर झटत आहेत.

महावितरण कंपनीच्या नुकसानीचा आणि दुरुस्तीचा तपशील असा – एकूण १२३९ गावांपैकी ७६० गावांमधील वीजपुरवठा बंद, ४७९ गावांत सुरू, एकूण ५५ उपकेंद्रांपैकी २८ बंद आहेत. एकूण ७५४८ पैकी १८८३ ट्रान्स्फार्मर सुरू असून ५६६५ सुरू करण्याचे काम सुरू आहे. एकूण पाच लाख ४५ हजार १२० वीजजोडण्यांपैकी एक लाख ८७ हजार ७११ जणांचा वीजपुरवठा सुरू झाला असून राहिलेल्या तीन लाख ५७ हजार ४०९ जणांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उच्च दाबाच्या वाहिनीचे १६४, तर लघुदाबाचे ३९१ खांब बाधित झाले. उच्च दाबाच्या ४९ किलोमीटरच्या, तर लघुदाबाच्या ११७ किलोमीटर लांबीच्या तारा बाधित झाल्या आहेत. १५ ट्रान्सफॉर्मर नादुर्सत आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या ७१ पथकांमधील ९१०, तर कंत्राटी पद्धतीच्या ३३ पथकांमधील ३०४ असे कर्मचारी काम करत आहेत.

जिल्ह्यातील ३९ पैकी २३ कोविड हॉस्पिटल्समधील वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणारे तिन्ही प्लॅंट सुरू झाले आहेत. महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सांयनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे आणि कैलास लवेकर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

साडेचार हजार जणांचे स्थलांतर, आठ जण जखमी
जिल्ह्यात वादळाने विविध मालमत्तांचे नेमके किती नुकसान झाले, याची मोजदाद प्रशासनातर्फे अजूनही सुरूच आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक घरे आणि गोठ्यांचे नुकसान झाले असून आठ जण जखमी झाले. जिल्ह्यात वादळादरम्यान आज सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी १३२ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक २७२ मिलिमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात पडला.

तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड ५२ मिमी, दापोली ८२ मिमी, खेड ४९ मिमी, गुहागर १२० मिमी, चिपळूण १०० मिमी, संगमेश्वर १४२ मिमी, रत्नागिरी २७४ मिमी, राजापूर २०८ मिमी, तर लांजा तालुक्यात १६२ मिमी पावसाची नोंद झाली.

वादळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने चक्रीवादळाच्या झालेल्या नुकसानीबाबतची आज, १७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतची प्राथमिक माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यानुसार मंडणगड तालुक्यात २०० घरे, दापोली तालुक्यात ३५० घरे, खेड तालुक्यात ३० घरे, गुहागर तालुक्यात ५ घरे, चिपळूणमध्ये ६५ घरे, संगमेश्वर १०२ घरे, रत्नागिरी तालुक्यात २०० घरे तर राजापूर तालुक्यात ३२ अशा एकूण एक हजार २८ घरांचे नुकसान झाले. रत्नागिरीमध्ये १, लांज्यात १ आणि राजापूरमध्ये ५ अशा ७ गोठ्यांचे नुकसान झालेय गुहागर येथे १, संगमेश्वरात १, रत्नागिरीमध्ये ३ आणि राजापूरमध्ये ३ अशा ८ व्यक्ती जखमी झाल्या. गुहागरमध्ये १ बैल, संगमेश्वरात १ बैल आणि रत्नागिरीत २ शेळ्या अशी ४ जनावरे मरण पावली. जिल्ह्यात ४५० झाडांची पडझड झाली असून १४ दुकाने-टपऱ्यांचे, ९ शाळांचे तर २१ शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

वादळामुळे राजापूर तालुक्यात ६५२, रत्नागिरी तालुक्यात ३६३, दापोली तालुक्यात २३७३, मंडणगड तालुका ५०८, गुहागर तालुका ६६७ अशा चार हजार ५६३ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांकडून मिळालेल्या अहवालानुसार कोणत्याही मच्छीमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत. सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply