दिल्ली, हरयाणानंतर रत्नागिरीत होणार ऑक्सिजन बँक

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीत चार कोविड केअर सेंटर सुरू करणार आहे. तसेच दिल्ली आणि हरयाणानंतर ऑक्सिजन बँकही उभारणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी झालेल्या ऑनलाइन बैठकीनंतर दिली.

रत्नागिरीतील कोविडची स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी ३५ ते ५० बेडची सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारणार आहे. आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, राजेश सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी आजच्या बैठकीत (१७ मे) भाग घेतला. बैठकीत कोविड केअर सेंटर उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. आमदार श्री. लाड येत्या बुधवारी ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भाजयुमो आणि जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द करणार असून त्या माध्यमातून ऑक्सिजन बँकेची उपयुक्त संकल्पना राबवण्यात येणार आहे. तसेच २ ॲम्ब्युलन्सही भाजपासाठी अंत्योदय प्रतिष्ठान आणि मी मुंबई अभिमान या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांनी जिंदाल कंपनीच्या माध्यमातून एक अतिरिक्त ऑक्सिजन टॅंक पुरविणार असून त्यालाही तांत्रिक मंजुरी द्यावी, अशी मागणी श्री. राणे यांनी केली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आमदार श्री. लाड त्यांच्या सीएसआर निधीतून आणखी एका हॉस्पिटलला त्यांच्या २० व्हेंटिलेटर बेड तसेच ऑक्सिजनसह १ ऑक्सिजन युनिट देऊन १०० बेडचे सुसज रुग्णालय सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यालाही तत्काळ मंजुरी दिली.

कोविडच्या परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता भाजप संपूर्ण सहकार्य करेल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. ग्रामदक्षता समित्या अधिक सक्रिय करा, त्यांच्यासाठी काही आर्थिक तरतूद करा, तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील पावसाचे पाणी साचण्याचा प्रकार लवकर नियंत्रणात आणा, अशा सूचना त्यांनी केल्या. नीलेश राणे यांनी आपल्या हॉस्पिटलच्या संपर्कातून तज्ज्ञ डॉक्टर आणि काही प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट केले.

या सर्व प्रयत्नांची गरज आहे. ‘ऑक्सिजन बँक’ ही नवीन संकल्पना येथे उत्तम पद्धतीने राबवू. तज्ज्ञ डॉक्टर आवश्यक आहेत. ही उपलब्धता महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रस्तावांना तत्काळ मंजुरी देणार असल्याचे सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply