सुरक्षेची सावली धरणाऱ्या पोलिसांना रोपांचे वाटप करून अनोखा पर्यावरण दिन

रत्नागिरी : करोनाच्या काळात रस्त्यांवर अहोरात्र कार्यरत राहिलेल्या पोलिसांना झाडांची रोपे देऊन रत्नागिरीतील तन्मय दाते या तरुणाने पर्यावरण दिन आगळ्या पद्धतीने साजरा केला.

तन्मय दाते हा रत्नागिरीतील पत्रकार-छायाचित्रकार तरुण आहे. गेल्या वर्षीपासून संपूर्ण देशात करोनाने थैमान घातले आहे. त्याविषयीची छायाचित्रे टिपताना त्याने रस्त्यांवर अहोरात्र कार्यरत राहिलेल्या पोलिसांचे कर्तव्य पाहिले. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता पोलीस कार्यरत होते. लागोपाठ दोन्ही वर्षी चक्रीवादळांनी कोकणाला तडाखा दिला. या आपत्तीमध्ये प्रसंगी रस्त्यावर आणि घरांवर कोसळलेली झाडे उचलायलासुद्धा पोलीस धावले होते. हे सगळे करताना करोनाच्या कर्तव्यात त्यांनी कसूर केली नाही. त्यांचे हे सारे काम तन्मयमधल्या माणसाला एखाद्या झाडासारखीच सुरक्षेची सावली नागरिकांवर धरल्यासारखे वाटले. त्यातूनच त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांचा सन्मान करण्याची इच्छा त्याच्या मनात वाढू लागली. त्यासाठी त्याने जागतिक पर्यावरण दिनाचा मुहूर्त निवडला.

गेले वर्षभर सामान्य नागरिक घरात आणि पोलीस अधिकारी- कर्मचारी रस्त्यावर उतरून करोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या अजोड कामाबद्दल कृतज्ञता म्हणून तन्मय दाते यांनी शहरात मारुती मंदिर, साळवी स्टॉप, जयस्तंभ, एसटी स्टॅण्ड अशा ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सन्मान केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, परिवीक्षाधीन अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, विजय जाधव, पोलीस कर्मचारी रत्नकांत शिंदे, महेश कुबडे, स्वप्नाली चव्हाण, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे, पोलीस मित्र जयदीप परांजपे, दीपक माणगावकर, शिक्षक आणि होमगार्ड यांच्यासह ५० जणांचा सन्मान केला.

तन्मय दाते यांना त्यांची आई दीपाली दाते, मित्र प्रथमेश भागवत, कौस्तुभ वायंगणकर यांचे सहकार्य लाभले.

आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान आणि पर्यावरण दिन साजरा करणाऱ्या तन्मय दातेचे पोलिसांनी कौतुक केले नसते, तरच नवल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply