सिंधुदुर्गात नवे ६४८ करोनाबाधित, ५०४ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५०४, तर एकूण २२ हजार ६४४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार १९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६४८ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आज दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या तिघांसह एकूण ६४८ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २९ हजार ५९० झाली आहे.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ११७, दोडामार्ग – ४३, कणकवली – ९८, कुडाळ – १३३, मालवण – ११२, सावंतवाडी – ७४, वैभववाडी – २७, वेंगुर्ले – ४०, जिल्ह्याबाहेरील १.

सध्या जिल्ह्यात ६ हजार १९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ८४३, दोडामार्ग २९८, कणकवली ९६८, कुडाळ १२०९, मालवण ११८४, सावंतवाडी ९३७, वैभववाडी २५७, वेंगुर्ले ४८०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २०. सक्रिय रुग्णांपैकी ३६३ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात आधीच्या ३ आणि आजच्या १३ अशा १६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ७४४ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड ४, कणकवली ४, कुडाळ २, मालवण ३, सावंतवाडी १, वैभववाडी २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १०१, दोडामार्ग – २३, कणकवली – १५२, कुडाळ – ११२, मालवण – १२०, सावंतवाडी – १२१, वैभववाडी – ५१, वेंगुर्ले – ६२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
………………..
सकारात्मक विचारांनीच करोनावर मात

वेंगुर्ल्यातील ३० वर्षीय करोनामुक्त रुग्णाची प्रतिक्रिया

मोठ्या प्रमाणावर आलेला ताप, अशक्तपणा, फॅमिली डॉक्टरनी न्युमोनियाचे केलेले निदान अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो. तेथील स्टाफने तत्परता दाखवत आयसीयूमध्ये दाखल करून वेळेवर उपचार केले. समुपदेशनातून सकारात्मक ऊर्जा मिळून करोनावर सहज मात करू शकलो, अशी भावना व्यक्त केली आहे वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील ३० वर्षीय करोनामुक्त रुग्णाने.

कामानिमित्त गोव्यात असणारी ही व्यक्ती घरी परत आली तीच मुळात ताप अंगात घेऊन. तेव्हा त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. तीन दिवसांची औषधेही घेतली. ताप कमी आल्याने पुन्हा गोवा येथे कामाला गेले. पण तिेथे कामाच्या ठिकाणी काही लक्षणे असलेले लोक काम करत होते. त्यातच त्यांना पुन्हा ताप येऊ लागला. कामावर रजा घेतली आणि पुन्हा घरी परतले. तातडीने डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरनी एक्सरे करून न्युमोनिया झाल्याचे निदान करून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसेच त्यावेळी आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुनाही घेण्यात आला. कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात ते दाखल होण्यासाठी गेले होते. पण त्यांना दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे ते थेट जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी त्यांना व्यवस्थित उभेही राहता येत नव्हते. ऑक्सिजन पातळी ७४ पर्यंत खाली आली होती. ही सर्व करोनाचीच लक्षणे असल्याने त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि उपचारांना सुरुवातही केली. वेळेवर मिळालेल्या चांगल्या उपचारांमुळे आज ते करोनामुक्त होऊन घरी परतले.

करोनाकाळातील रुग्णालयातील आपल्या अनुभवाविषयी बोलताना ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयामध्ये आलो, त्यावेळी बेड्स मिळण्याची धास्ती होती. पण जिल्हा रुग्णालयांतील डॉक्टरांनी योग्य ती व्यवस्था करून मला बेड उपलब्ध करून दिला आणि थेट आयसीयूमध्ये दाखल केले. त्यावेळी माझी ऑक्सिजन पातळी ७४ वर होती. एचआरसीटी स्कोअर २३ इतका होता. दहा दिवस मला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सुरुवातीस मास्कचा त्रास होत होता. मी तो काढायला प्रयत्न करत होतो. पण तेथील नर्स मला तसे करू देत नव्हत्या. पूर्णवेळ व्हेंटिलेटर सुरू असायचा. त्यामुळे पाणीसुद्धा स्ट्रॉने प्यावे लागत होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी चांगली देखभाल केली. व्हेंटिलेटरच्या मॉनिटरवर नर्स नियमित लक्ष ठेवून असे. त्याचे प्रमाण कमी-जास्त करून व्यवस्थित ऑक्सिजन मिळेल, असे पाहिले जात होते. रोज चांगले जेवण मिळत होते. जेवणासोबत दोन्ही वेळा अंडी, सकाळी आणि संध्याकाळी काढा दिला जात होता. करोनामुळे माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागले. याकडे लगेच लक्ष देऊन माझ्या आहारामध्ये बदल करण्यात आला. मानसिकता चांगली राहावी, यासाठीही समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे सकारात्मकता निर्माण होऊन करोनावर सहज मात करणे शक्य झाले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सनी केलेले उपचार आणि सहकाऱ्यामुळेच आज मी करोनामुक्त होऊन घरी परतलो आहे. जिल्हा रुग्णालयाने मला दिलेल्या जीवदानाबद्दल शतशः प्रणाम…

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply