मंडणगड पंचायत समितीचा पाच एकर हळद लागवडीचा पथदर्शक प्रकल्प

मंडणगड : येथील पंचायत समितीतर्फे पाच एकर क्षेत्रावर ४० हजार हळद रोपांची लागवड करण्याचा पथदर्शक प्रकल्प आकाराला येत आहे. इतर तालुक्यांसाठीही तो आदर्शवत आहे.

जिल्हा परिषद आणि मंडणगड पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्यात प्रथमच हळद लागवडीचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून हळकुंडापासून हळदीची ४० हजार रोपे प्रोट्रेमध्ये तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे पाच एकर क्षेत्रावर विविध शेतकऱ्यांच्या शेतावर या हळदीची लागवड करण्यात येणार असून हा पथदर्शक प्रकल्प असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी दिली.

येत्या खरीप हंगामात पंचायत समितीतर्फे हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. गेले ३-४ महिने या प्रकल्पाबाबतची माहिती शेतकऱ्यांना देऊन याबाबतचे प्राथमिक माहितीवजा प्रशिक्षणही पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आले. ज्या इच्छुक शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सहमती दर्शवून नोंदणी केली, त्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने सुमारे पाच एकर क्षेत्रावर हळदीची लागवड होणार आहे. कमीत कमी एक गुंठा ते जास्तीत जास्त १० गुंठे क्षेत्र लागवडीसाठी निवडण्यात आले आहे. या प्रकल्पाला संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन पंचायत समितीच्या कृषी विभागाचे कृषी अधिकारी विस्तार अधिकारी करणार आहेत.

मंडणगड तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचा हळद लागवडीचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या पथदर्शक प्रकल्पात आबलोली (ता. गुहागर) येथील प्रगतिशील शेतकरी सचिन कारेकर यांनी गेल्या १५ वर्षांच्या प्रयत्नाने निवड पद्धतीने विकसित केलेल्या स्पेशल कोकण- ४ (SK-4) या रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम प्रकारे होऊ शकणाऱ्या या हळदीच्या वाणाचा उपयोग करण्यात आला आहे. हळकुंडापासून ४० हजार हळदीची रोपे प्रो-ट्रेमध्ये तयार करण्याचे काम कुंबळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सौ. समीक्षा लोखंडे यांच्या रोपवाटिकेत पूर्ण झाले आहे. हळकुंडापासून रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पंचायत समितीचेच कृषी अधिकारी विशाल जाधव, विस्तार अधिकारी (कृषी) गजेंद्र पौनीकर आणि पवन गोसावी यांनी केले.

हा पथदर्शक प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सभापती सौ. स्नेहल सकपाळ, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. गजेंद्र पौनीकर – 94209 72402

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. धन्यवाद श्री.कोनकर सर..
    हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबाबत वृत्त प्रकाशित करून आम्हाला उपकृत केले.

Leave a Reply