चार दिवसांत अतिजोरदार पावसाची शक्यता, सावधगिरीचा इशारा

रत्नागिरी : येत्या १२ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी म्हणाले, राष्ट्रीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात येत्या चार दिवसांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. दोनशे मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे. खेड, चिपळूण आणि राजापूर नगरपालिका तसेच जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय समुद्राच्या जोरदार लाटा दाभोळ, हर्णै, आंजर्ले इत्यादी बंदरे आणि खाडीकिनाऱ्यावर उसळण्याची शक्यता असल्यामुळे तेथील गावे आणि घरे यांनाही धोका आहे. हे लक्षात घेऊन तेथील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तसेच त्यांना बांधून ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थितीमध्ये मदतीसाठी पाच तालुक्यांमध्ये जीवरक्षक पाच बोटी देण्यात आल्या असून पालिकांनीही बोटींचे नियोजन केले आहे. पोलीस, नगरपालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांच्या मदतीने बचावकार्य केले जाणार आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्यही तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे ४५ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग, घाटरस्ते तसेच जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरही दरडी कोसळू शकतात. तेथील वाहतूक बंद पडू शकते.

श्री. मिश्रा म्हणाले, चिपळूणमधील वाशिष्ठी पुलासारख्या धोकादायक ठिकाणी २४ तास गस्त घातली जाईल. कोकण रेल्वेलाही सूचना देण्यात आल्या असून विभागीय व्यवस्था उपेंद्र शेंड्ये यांनी आवश्यक ते खबरदारीचे उपाय योजले आहेत. अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून आल्यानंतर जिल्ह्यात दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्याचाही विचार आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडण्याची शक्यता कमी असेल आणि त्यामुळे धोकाही कमी होईल.

अतिपावसामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आली आहे. गेल्या १ जूनपासून मच्छीमारी अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे. मात्र अनधिकृतपणे मच्छीमारीला जाणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यामुळे ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर आहेत. तेथील वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. दोन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठाही सर्व ठिकाणी करण्यात आला आहे. मलनिस्सारण व्यवस्था चांगली राहावी, यासाठी सूचना देण्यात आल्या असून मॅनहोल, तसेच गटारे उघडी राहू नयेत, ती बंद करावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply