सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, १८ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे नवे ४२७ रुग्ण आढळले, तर ३०९ रुग्ण करोनामुक्त झाले. दरम्यान, करोनामळे आई आणि वडील असे दोन्ही पालक मरण पावल्याने पोरकी झालेली दहा बालके सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून त्यांच्या देखभालीचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या जिल्ह्यात ६ हजार २९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याबाहेरील ७ जणांच्या तपासणीसह ४२७ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १९, दोडामार्ग – १६, कणकवली – ९९, कुडाळ – ८३, मालवण – ६४, सावंतवाडी – ५१, वैभववाडी – ३६, वेंगुर्ले – ५७, जिल्ह्याबाहेरील २.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७५९, दोडामार्ग २१६, कणकवली १०९३, कुडाळ १२११, मालवण ११९४, सावंतवाडी ८०१, वैभववाडी ३२८, वेंगुर्ले ६६६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २९. सक्रिय रुग्णांपैकी ३२१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज ३०९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या २९ हजार ४११, तर एकूण करोनाबाधितांची संख्या ३६ हजार ६३३ झाली आहे.
आज जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९१९ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – कुडाळ २, देवगड १, मालवण १, सावंतवाडी १, वेंगुर्ले १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १२८, दोडामार्ग – २७, कणकवली – १८२, कुडाळ – १४२, मालवण – १६९, सावंतवाडी – १३४, वैभववाडी – ६२, वेंगुर्ले – ७०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५.
करोनामुळे पालक हरपलेली सिंधुदुर्गात दहा बालके
करोनामळे आई आणि वडील असे दोन्ही पालक मरण पावल्याने पोरकी झालेली दहा बालके सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. या बालकांबाबतची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिले.
करोनामुळे दोन्ही पालक मरण पावलेल्या १८ वर्षांखालील बालकांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. अशी जिल्ह्यात १० बालके असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतच्या कृती दलाची बैठक आज झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता मोहोपात्रा, जिल्हाविधी व सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. दीपक म्हालटकर, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष पी. डी. देसाई, पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे, सहायक समाज कल्याण आयुक्त जयंत चाचरकर, महिला बाल कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी उपस्थित होते.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी सविस्तर माहिती दिली. करोनामुळे दोन्ही पालक मरण पावलेली १८ वर्षांखालील १० मुले, एक पालक मरण पावलेली १२१ मुले, तर १३५ विधवा महिला जिल्ह्यात आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, विधवा महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करावा. रोटरी, लायन्ससारख्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही विधवा तसेच बालकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत समन्वय करावा. मालमत्ता हक्क अबाधित राहण्यासाठी तहसीलदारांशीही पत्रव्यवहार करावा. याबा लकांची जवळच्या आरोग्य केंद्रात आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष ठेवावे. विशेषतः मुलींबाबत अधिक जबाबदारीने दक्षता घ्यावी. समुपदेशकांमार्फत समुपदेशन करण्यासाठी त्यांची यादी मागवून घ्यावी. पालकांचा मृत्यू दाखला आरोग्य विभागाकडून घ्यावा. त्याचबरोबर १८ वर्षांखालील बाधित मुले आणि मुली याबाबतची माहिती विभागाने तयार ठेवावी.
कोविड काळात अवैधरीत्या दत्तक प्रकरण आणि बालविवाह रोखण्यासंदर्भात तालुका पातळीवर जनजागृतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाने पोस्टर्स लावावेत. यासाठी काही सेवाभावी संस्थांचीही मदत घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.
संबंधित बालक ज्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहे, त्यांच्याकडून त्यांची काय जबाबदारी आहे, याबाबत त्यांना सूचना करून तशी लेखी हमी घ्यावी, अशी सूचना पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनी केली. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात आठवी पासून पुढे प्रवेशासाठी अनाथ मुलांसाठी दोन टक्के जाग राखीव असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त श्री. चाचरकर यांनी दिली.
Follow Kokan Media on Social Media



