जनतेच्या भल्यासाठी महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना

डॉक्टर्स डे विशेष

डॉ. रेणुका आशीष चौघुले

दरवर्षी १ जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर उपचार आणि त्यासाठीच्या खर्चाचे असणारे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला लॉकडाउनने अनेकांचा गेलेला रोजगार अशा स्थितीत महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना सर्वांना उपचारासाठी उपलब्ध आहे. या योजनेतून मोठे काम राज्यात होत आहे. याबाबत महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. रेणुका आशीष चौघुले यांनी दिलेली माहिती.

……..

गेल्या दीड वर्षापासून आपणच नव्हे तर सारे जग करोना महामारीच्या छायेत आहे. आजारपण म्हटले की उपचार आणि उपचार करण्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणावरील खर्च ठरलेला आहे.

ज्यांनी स्वत:चा आरोग्य विमा काढला आहे, अशांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्या स्वरूपाची जागरूकता अद्याप समाजात आलेली नाही. आता करोनाच्या या संकटामळे ती आलेली दिसते. अशा स्थितीत गरीब आणि हातावर पोट असणारे मजूर, तर काही असंघटित क्षेत्रातील कामगार या साऱ्यांना उपचारावर खर्च झेपणारा नाही, हे स्पष्ट आहे. त्यात हा नव्या प्रकाराचा विषाणुजन्य आजार असल्याने त्यावरील उपचाराचा खर्च मोठा आहे. दुसऱ्या बाजूला एकाच वेळी सर्व जण आजारी पडू नयेत, म्हणून टाळेबंदी (लॉकडाउन) जाहीर करावी लागली.

चाचण्या आणि उपचारांचा खर्च आव्हान म्हणून समोर असताना दुसऱ्या बाजूला रोजगार गेल्याने सामान्यांची स्थिती अत्यंत अडचणीची झाली होती. असा अडचणीचा प्रसंग आल्यास शासनाकडे सर्व जण धाव घेतात. राज्यातील शासनाने खूप आधी तरतूद करून ठेवलेली होती ती महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून.

लोकशाहीत लोकांसाठीचे राज्य चालवताना लोकांसाठी सामाजिक संरक्षण देणारी महत्त्वाची अशी ही जनआरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत ९९६ प्रकाराचे आजार आणि आयुष्मान भारत योजनेत २१३ प्रकारच्या आजारांवर उपचारांची सुविधा देण्यात आलेली आहे.

महात्मा जोतीराव फुले योजनेअंतर्गत दीड लाख तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रतिकार्डधारक पाच लाखांपर्यंतच्या उपचारांचा खर्च शासन करते. ही योजना इतर सर्व आजारांसाठी असली तरी कोविडचा यात समावेश नव्हता. शासनाने बदल करून तातडीने राज्यातील प्रत्येकाला करोनाच्या उपचारांचे संरक्षण मिळवून दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेतून ७२० कोविड रुग्णांवर उपचार झाले. तसेच योजनेअंतर्गत ५३७० नॉनकोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

या योजनेची सविस्तर माहिती अशी –
लाभार्थी : राज्यातील सर्व रेशनकार्डधारक आणइ देशातील आयुष्मान ई कार्डधारक

उपचार संख्या : महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये ९९६ आणि आयुष्मान भारत योजनेमध्ये अधिक २१३ आजारांवर उपचार. एकूण १२०९ आजारांवरील उपचारांचा समावेश आहे.

लाभ : दीड लाख रुपये महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि ५ लाख आयुष्मान भारत ईकार्डधारक प्रतिवर्ष

रुग्णालये :,
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १६ रुग्णालयांचा समावेश या योजनेत आहे. त्या मध्ये ९ शासकीय आणि ७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.

सद्यःस्थितीत एकूण १६ रुग्णालयांपैकी ११ कोविड रुग्णालये योजनेतून काम करत आहेत. उर्वरित ५ रुग्णालये नॉनकोविड म्हणून काम करत आहेत.

कोविड शासकीय रुग्णालये – जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी, उपजिल्हा रुग्णालये – कामथे, दापोली आणि कळंबणी, ग्रामीण रुग्णालये – पाली, मंडणगड, गुहागर, संगमेश्वर.

कोविड खासगी रुग्णालये – लाइफकेअर हॉस्पिटल, चिपळूण, बीकेएल वालावलकर रुग्णालय, डेरवण, चिपळूण, परकार हॉस्पिटल, रत्नागिरी.

नॉनकोविड रुग्णालये – श्री रामनाथ हॉस्पिटल, रत्नागिरी, पं. दीनदयाळ हॉस्पिटल, लांजा, एसएमएस हॉस्पिटल, चिपळूण, अपरांत हॉस्पिटल, चिपळूण, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी.

या योजनेविषयी अधिक माहिती http://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • शब्दांकन प्रशांत दैठणकर
    (जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply